ज्ञानवापी मशिदीत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे सर्वेक्षण दुसऱ्या दिवशीही सुरू होते. या दरम्यान ज्ञानवापी खटल्यातील वकील सीता साहू यांनी दावा केला की, पश्चिमेकडच्या भिंतीवर अर्धा पशू आणि अर्ध्या मानवाची प्रतिमा आढळली आहे. याचा तपास पुरातत्त्व विभागाचे पथक करत आहे. या पथकाकडून अशा प्रकारे कोणताही दावा करण्यात आलेला नाही. तसेच, असा दावा अन्य कोणीही केलेला नाही. सर्वेक्षणात मुस्लिम पक्षाकाराचे पाच सदस्यही सहभागी झाले होते. इंतजामिया मशिद समितीचे वकील अखलाक आणि मुमताज या सर्वेक्षण पथकासोबत होते. शुक्रवारी मुस्लिम पक्षकारांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला नव्हता.
हे ही वाचा:
‘जगदीश टायटलर यांनी जमावाला उकसवले; पुरेसे शीख मारले गेले नाहीत, असे म्हणाले’
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना नको आहे ‘हिंदीची गुलामगिरी’
ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित
मुस्लिम पक्षकारांचे वकील मुमताज अहमद यांनी ज्ञानवापी परिसरातून बाहेर पडल्यानंतर सांगितले की, आम्ही सर्वेक्षणात संपूर्ण सहकार्य करत आहोत. पथकाकडून आता मशिदीच्या वरील भागाचे सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.हिंदू पक्षाचे वकील सुधीर त्रिपाठी यांनी दावा केला की, ढिगाऱ्यात मूर्ती नव्हे तर मूर्तींचे तुकडे आढळले आहेत. मात्र आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, येथे मूर्तीदेखील मिळतील. इंतजामिया मशिद समिती सर्वेक्षणात पूर्णपणे सहकार्य करत असून त्यांनी आता तळघराची चावीही दिली आहे. याआधी समितीने ही चावी दिली नव्हती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मुस्लिम बोर्ड नाराज
ज्ञानवापी मशिद परिसराचे सर्वेक्षण करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने नाराजी दर्शवली. हा निर्णय धक्कादायक आणि दु:खद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.