गुढीचे स्वरूप-
चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.
अन्य धार्मिक उपचार-
स्नान इ. दैनंदिन कर्मे झाल्यावर गुढी उभारली जाते. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात. गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे,असा संकेत रूढ आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती – जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे बुधवारी सुरू होत आहे म्हणून बुध हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते.
हे ही वाचा:
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक
नववर्षाच्या शुभेच्छा, आला गुढी पाडवा!
वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीत जाते आहे म्हणत विरोधकांची रडारड
फक्त नेते एकत्र येऊन भाजपाला कसे काय हरवणार… प्रशांत किशोर यांनी विचारला प्रश्न
साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८ व्या भव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७ व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात. या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.:-
“तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यावर्धनम् |
नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ||
करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् |
एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्||”
अर्थ – तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते.वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्राच्या श्रवणाने पापनाश होतो. योगाच्या श्रवणाने रोग जातो. करणाच्या श्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते.