चैत्र शु. प्रतिपदा: गुढी पाडवा
या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरु होते. दक्षिण भारतात व भारताच्या इतर भागांतून नूतन वर्षारंभ चैत्र प्रतिपदेस होतो. या दिवशी काही धार्मिक विधी सांगितले आहेत. त्यांत ब्रह्मपूजा हा महत्वाचा विधी असतो. त्याचा इतिहास ब्रह्मपुराणात दिला आहे. व्रतराज या ग्रंथात असे सांगितले आहे की, ब्रह्मदेवाने चैत्र शु. प्रतिपदेच्या दिवशी सकाळी समस्त जग निर्माण करुन कालगणना सुरु केली. त्या तिथीला सर्व उत्पात, सर्व पापे व कलीकृत दुःस्वप्ने यांचा नाश करणारी महाशांती करावी, असे म्हटले आहे. ब्रह्मदेवाची पूजा झाल्यानंतर विपळे, पळे, घटिका, प्रहर इ. सर्व कालविभागांची, दक्षकन्यांची व विष्णूची पूजा करावी. यविष्ट नावाच्या अग्नीमध्ये हवन करावे. ब्राह्मण-भोजन घालावे. व आप्तेष्टांना देणग्या द्याव्यात. ज्या वारी वर्षप्रतिपदा येते, त्या वाराच्या अधिपतीची पूजा करावी,असे एक विधान भविष्यपुराणात सांगितले आहे. त्याशिवाय ‘व्रतपरिचया’ त एक पूजेचा विधी सांगितला आहे. तो असा-
या दिवशी सकाळी प्रातःस्नानादी नित्यकर्मे उरकून हातात गंधाक्षतपुष्प् जलादी घेऊन,
‘मम सकुटुंबस्य सपरिवारस्य स्वजनपरिजनसहितस्य वा आयुरारोग्यैश्वर्यादि सकलशुभफलोत्तरोत्तराभिवृध्द्यर्थं ब्रह्मादिसंवत्सर पूजनं करिष्ये
चौरस चौरंगावर किंवा वाळूच्या पेढीवर शुभ्रवस्त्र पसरुन आणि त्यावर हळदीने अगर केशराने मिश्रित अशा अक्षतांचे अष्टदळ कमळ तयार करुन त्यावर सुवर्णमूर्तीची स्थापना करावी.
‘ॐ ब्रह्मणे नमः ।’
या मंत्राने ब्रह्मदेवाने आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान,वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, आचमन, तांबूल,आरती, नमस्कार, पुष्पांजली व प्रार्थना या उपचारांनी पूजन करावे.
अशा प्रकारे उपरोक्त समस्त देवतांचे वेगवेगळे अथवा एकत्र यथाविधी पूजन करावे. नंतर
भगवंस्त्वत्प्रसादेन वर्ष क्षेममिहास्तु मे ।
संवत्सरोपसर्गा मे विलयं यान्त्वशेषतः ।
अशी प्रार्थना करावी. ब्राह्मणांना विविध पकवानांचे भोजन घालावे व स्वतः एकवेळ जेवावे. पूजेच्यावेळी नवीन पंचांगाची पूजा करुन त्यावरुन त्या वर्षाचा राजा, मंत्री, सेनापती, धनाधिपती, धान्याधिपती, दुर्गाधिपती, संवत्सरनिवास आणि फलाधिपती आदींचे फल श्रवण करावे.
या दिवशी आणखी एक विधी भविष्यपुराणात सांगितला आहे. त्या दिवसाचा लौकिक विधी असा:-
प्रातःकाळी अंगणात सडासंमार्जन करुन घरातील सर्व माणसे तैलाभ्यंग करुन उष्णोदकाने स्नान करतात. कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचे भांडे घालून त्यावर कडुलिंबाचे ढाळे व फुलांची माळ बांधून दारात तो ध्वज म्हणजेच गुढी उभी करतात. यालाच ब्रह्मध्वज असे म्हणतात व त्याची पूजा करतात. (अलीकडे या गुढीस साखरेची माळ बांधतात व घरावरील उंच अशा जागी ती उभी करतात.) आपले घर ध्वज, पताका,तोरणे इ. सुशोभीत करतात. (अलीकडे लहान मुलांना साखरेच्या माळा वाटतात.) या दिवशी पुरुष, स्त्रिया व मुले नवीन वस्त्रालंकार घालून आपल्या घराण्याच्या चालीरीतीप्रमाणे कुलदेवतेचे अगर ग्रामदेवतेचे दर्शन घेतात.
दुपारी सवाष्ण व ब्राह्मणासह मिष्टान्नाचे भोजन करतात. ज्यांच्या त्यांच्या घरातील रुढीप्रमाणे ग्रामजोशीकडून अगर उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात् वर्षफल श्रवण करतात. या पंचांगश्रवणाचे फल पुढीलप्रमाणे आहे : तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते ; वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते; नक्षत्रश्रवणाने पापनाश होतो; योगश्रवणाने रोग जातो; करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते; असे हे पंचांगश्रवणाचे उत्तम फल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगा स्नानाचे फल मिळते.
या तिथीला युगादी तिथी असे म्हणतात. या दिवशी शक्य असेल तर पाणपोई घालावी. निदान उदककुंभाचे तरी दान करावे. म्हणजे पितर संतुष्ट होतात. देवावर सतत धार बांधावी. पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे. त्याचा मंत्र असा-
एष धर्मघटो दत्तो ब्रह्माविष्णु शिवात्मकः ।
अस्य प्रदानात्सफला मम सन्तु मनोरथाः ॥
हा दिवस इष्टमित्र व कुटुंबातील मंडळींसह आनंदात घालविल्याने वर्षभर सुख लाभते, असे त्याचे फळ आहे. या दिवशी आपापल्या कुलाचाराप्रमाणे वासंतिक देवीचे अथवा श्रीराम-चंद्राचे नवरात्र सुरु करतात.
गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला आहे.
संकलित
– महाजन गुरुजी