हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानच्या वतीने मुंबईत चार दिवसीय भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चारही दिवस या कार्यक्रमाला लोकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ‘न्यूज डंका’ या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर होता.
हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानच्या वतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळावा पार पडला. ९ जानेवारीला स्वामी गोविंद देव गिरी महाराज, देवेंद्र ब्रह्मचारी, मैत्रेय दादाश्रीजी यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन झाले. मूल्यवर्धन म्हणजेच राष्ट्रनिर्माण हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य होते. चारही दिवस दररोज योग साधना आणि गंगा आरती पार पडली. या मेळाव्याच्या माध्यमातून हिंदू मंदिरे, मठ, साधू संत यांच्या रूपाने मानव कल्याणासाठी कशी सेवा केली जाते, याचे प्रत्यक्ष दर्शन लोकांना घडले.
राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे ही पहिल्या दिवशी उपस्थित होते. ते म्हणाले की, कोणीही भारताला धर्मनिरपेक्षता काय आहे हे शिकवण्याची गरज नाही. जगात आपण एकमेव धर्मनिरपेक्ष देश आहोत. भारत हा एकमेव देश आहे जिथे ज्यू लोकांना येथील मूळ लोकांकडून वाईट वागणूक दिली गेली नाही किंवा त्यांना धमकावले गेलेले नाही. कोविड- १९ या महामारीच्या संकटादरम्यान भारताने गरीब देशांना लस दिल्या. अमेरिका आणि काही पाश्चात्य युरोपियन राष्ट्रांप्रमाणे भारताने लसींचे पेटंट मिळवून पैसे मिळवले नाही. आम्हाला मानवतेला वाचवायचे आहे आणि म्हणूनच आम्हाला सामर्थ्यवान बनायचे आहे. धर्माचे संरक्षण करणे आवश्यक आहे आणि अशा प्रकारे हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळावा (HSSF) संघटनेची गरज आहे.
हे ही वाचा :
सोनमर्ग- लडाखला जोडणाऱ्या बोगद्याचे पंतप्रधानांनी केले उदघाटन!
आगीच्या तांडवातून वाचलेल्या पाळीव कुत्र्याला घेऊन तो नाचला!
ग्रूमिंग गँग फाईल्स: ब्रिटनमधील अत्याचार, हत्या, बलात्काराचे भयंकर वास्तव!
निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री आतीशी यांच्या पदरात १८ लाख जमा!
अनेक संस्थांनी या मेळाव्यात सहभाग घेत कार्यक्रम सादर केले. आचार्य वंदन, कन्या वंदन असे कार्यक्रम पार पडले. विशेष म्हणजे या कार्यक्रमांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. राणी दुर्गावती मुलींचे वसतिगृह, वनवासी कल्याण आश्रम यांच्याकडूनही नृत्याचा कार्यक्रम करण्यात आला. शिवाय कीर्तन, भजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनीही शनिवारी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. विविध कार्यक्रमांची रेलचेल असल्यामुळे या भव्य मेळाव्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.