चारधाम यात्रेला दणदणीत प्रतिसाद

२२ लाखांहून अधिक भाविकांची नोंदणी

चारधाम यात्रेला दणदणीत प्रतिसाद

आजपासून चारधाम यात्रेचा शुभारंभ होत आहे. यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ धामची द्वारे १० मे रोजी उघडतील. १२ मे रोजी बद्रीनाथची दारे उघडतील. चारधाम यात्रेसाठी बुधवारपर्यंत २२ लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली होती. तर, दुसरीकडे मंदिर समितीने यात्रेदरम्यान मोबाइलवरून रील न बनवण्याचे आवाहन केले आहे. भविष्यात मोबाइलवर बंदी आणण्याचाही मंदिर समितीचा विचार आहे.

चारधाम यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले. तसेच, सरकारने सध्या २५मेपर्यंत सर्व राज्यांना व्हीआयपी, व्हीव्हीआयपींनी दर्शनाला येऊ नये, असे आवाहन केले आहे.

केदारनाथसाठी सर्वाधिक साडेसात लाख भाविकांची नोंदणी

चारधाम यात्रेसाठी बुधवारी एकूण २२ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. त्यातील यमुनोत्रीसाठी तीन लाख ४४ हजार १५०, गंगोत्रीसाठी तीन लाख ९१ हजार ८१२, केदारनाथसाठी सात लाख ६० हजार २५४, बद्रीनाथसाठी सहा लाख ५८ हजार ४८६ आणि हेमकुंड साहिबसाठी ४५ हजार ९५९ जणांनी नोंदणी केली आहे. बुधवारी दिवसभर ५९ हजार ८०४ जणांनी नोंदणी केली. बद्रीनाथ धाममध्ये टोकन मिळणार आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

हे ही वाचा:

खलिस्तानी गुरुपतवंत पन्नू प्रकरणी रशिया भारताच्या पाठीशी

‘पाईपने भरलेल्या ट्रकमध्ये सापडले ८ कोटी’

एअर इंडियाच्या रजेवर गेलेल्या २५ कर्मचाऱ्यांना कायमची ‘रजा’

“पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आला पाहिजे, आम्ही त्यासाठी वचनबद्ध”

हरिद्वारमध्ये पहिल्याच दिवशी यंत्रणा कोलमडली

हरिद्वारमध्ये चारधाम यात्रेची नोंदणी करण्यासाठी आलेल्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. ऑनलाइन नोंदणीचे सर्व स्लॉट भरल्यामुळे ऑफलाइन नोंदणीची सुरुवात बुधवारपासून झाली. पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार भाविक जमा झाले. मात्र ऑफलाइन नोंदणीची संपूर्ण यंत्रणा कोलमडली. रात्री उशिरापर्यंत येथे नोंदणी करण्यासाठी यात्रेकरूंची गर्दी जमली होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनी येऊन भाविकांना एका रांगेत उभे राहायला सांगून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Exit mobile version