राज्यासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, भारतासह परदेशातही तेवढ्याच जल्लोषात बाप्पाचं आगमन झाल्याची माहिती समोर आली आहे. जपान मधील योकोहामा मंडळाने मोठ्या उत्साहात गणेश भक्तांनी दोन दिवसीय बाप्पांचे स्वागत केले होते.
जपानमध्ये योकोहामा मंडळाला जपानमधील सर्वात मोठे गणेश उत्सव मंडळ म्हणून ओळखले जाते. योकोहामा मंडळाने ढोल ताशा झांज लेझीमच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले. जपानमधील किरीगाओकाचा, योकोहामाचा परिसर या सोहळ्याने अगदी दुमदुमला होता. यंदाचे योकोहामा मंडळाचे गणेशोत्सवाचे सातवे वर्ष होते. ३ आणि ४ अशा दोन दिवसांसाठी या मंडळाने बाप्पा बसवला होता.
या मंडळाने मुंबईतील घाटकोपर येथून बाप्पांची मूर्ती मागवली होती. बाप्पाला सुंदर पालखीत विराजमान करून ध्वज पताका फडकवत सुबक रांगोळ्या काढून भव्य मिरवणूक काढण्यात आली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते. विशेष म्हणजे यामध्ये जपानी नागरिकसुद्धा मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. पुरुष मंडळी फेट्यात तर स्त्रिया नऊवारी नथ घालून उठून दिसत होत्या.
या मंडळाचे यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रस्थानी ठेवून इस्रोच्या यानांचा हालता देखावा तयार केला आहे. या देखाव्याची तयारी एक महिन्यांपासून करण्यात आली होती. तसेच योकोहामा मंडळातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा, श्लोक स्तोत्र पठण, विविध मैदानी खेळ यांचा विशेष समावेश होता. यासोबतच गायन नृत्य, वाद्य वादन, कथाकथन या कार्यक्रमातही लहान-थोर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकूण ५० कार्यक्रम सादर केले गेले होते.
हे ही वाचा:
उमाजी नाईकांनी इंग्रजांविरोधात प्रसिद्ध केला होता जाहीरनामा
बाप्पाचं आधारकार्ड पाहिलंत का?
डिमॅट खात्यांनी ओलांडली १० कोटींची संख्या
‘कर्तव्यपथ’वर झाले शिक्कामोर्तब
दोन दिवसांच्या गणेशोत्सवाचे आयोजन या मंडळाने केले होते. चार तारखेच्या संध्याकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.