सोलापूर येथील सिद्धेश्वर तलावात एक शिवलिंग आढळून आले आहे. स्थानिक युवकांच्या पुढाकाराने श्री सिद्धेश्वर तलावाच्या काठाने असलेले निर्माल्य, पाण्याच्या बाटल्या, नारळ आणि इतर वस्तू यांची स्वच्छता केली जाते. दर आठवड्याला स्वच्छता मोहीम राबवली जाते. या स्वच्छता मोहिमे दरम्यान युवकांना गाळातून एक शिवलिंग सापडले.
मागील काही दिवसांपासून सोलापुरातील युवकांनी श्री सिध्देश्वर तलाव स्वच्छतेचा विडा उचलला आहे. आठवड्यातून एक दिवस शहरातील युवक तलावाची स्वच्छता करतात. अशीच स्वच्छता मोहिम राबविताना हे शिवलिंग सापडले. विशेष म्हणजे हे शिवलिंग चतुर्मुखी आहे.
मोहिमेतील महेश धाराशिवकर यांनी सांगितले की, ‘इतिहास संशोधक नितीन अनवेकर यांच्याशी चर्चा करून दयानंद महाविद्यालय येथील वास्तु संग्रहालयास हे शिवलिंग भेट देण्याचा मानस आहे. ज्यामुळे अभ्यासकांना शिवलिंगाविषयी अभ्यास करता येईल आणि जिज्ञासूंना ते पाहता येईल.’
हे ही वाचा:
मंदिरात नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीला अटक
सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन
धुळ्यात अनधिकृत टिपू सुलतान स्मारक रात्री उशिरा हटविले
डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय
अशी आहे शिवलिंगाची रचना
तलावात सापडलेल्या शिवलिंगाची रचना चतुर्मुखी असून अशा प्रकारची शिवलिंगे आणि मंदिरे हिमाचल प्रदेश, नेपाळ या प्रदेशात प्रामुख्याने आढळतात. हे चतुर्मुख लिंग चार दिशांचे आणि ईश्वराच्या चार पैलूंचे प्रतिनिधित्व करते.