राज्यात सत्ता पालटानंतर दोन वर्षांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव सण कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरे करता येणार आहेत. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बोरिवली येथील स्वर्गीय प्रमोद महाजन मैदानावर ‘शो ग्लिट्स इंव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट’च्या वतीने नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षीही नवरात्रोत्सवामध्ये ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक हजेरी लावणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोविड- १९ या जागतिक महामारीमुळे देशभरात सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करता आले नव्हते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे प्रशासनाकडून सार्वजनिक नवरात्रोत्सवाला हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. याच निमित्ताने फाल्गुनी पाठक यंदा या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. गुजरातीबहुल बोरिवलीमध्ये आपल्या अफलातून गाण्याच्या जादूने फाल्गुनी फाटक रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. २०१६ पासून सलग चार वर्षे फाल्गुनी पाठक यांनी बोरिवलीतील नवरात्रोत्सवात लोकगीते आणि बॉलिवूडची गाणी त्यांच्या अनोख्या शैलीत गाऊन संगीतप्रेमींना आनंद दिला आहे.
‘शो ग्लिट्स इंव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट’च्या वतीने बोरिवली येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी फाल्गुनी पाठक यांनी सांगितले की, “कोविडच्या वाईट परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर लोक आता पुन्हा दैनंदिन आयुष्य जगायला लागले आहेत. अशा परिस्थितीत मी जगदंबा मातेकडे सर्वांना सुख, समृद्धी आणि सुरक्षितता प्रदान करण्याची प्रार्थना करते. नवरात्रीच्या मंचावरुन लोकांना थिरकताना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे,” असं त्या म्हणाल्या.
यावेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टीसुद्धा उपस्थित होते. “उत्तर मुंबई आणि विशेषतः बोरिवलीमधील लोक प्रत्येक सण धार्मिक सलोख्याने आणि आनंदाने साजरा करतात म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सव सलग पाचव्यांदा बोरिवलीत होणार आहे. विद्यमान सरकारने सणांवरची टांगती तलवार हटवली आहे,” असे गोपाळ शेट्टी म्हणाले.
यंदा चार दिवस मध्यरात्रीपर्यंत हा गरब्याचा कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती देखील गोपाळ शेट्टी यांनी शासनाकडे केली आहे. तसेच ज्याप्रमाणे गोविंदा उत्सव आणि गणेशोत्सव मंडळांवर दाखल केलेल्या केस मागे घेतल्या त्याचप्रमाणे नवरात्री उत्सव मंडळांवरील केस मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील केली आहे.
हे ही वाचा:
गुलाम आझाद यांचा काँग्रेसला रामराम, स्थापन करणार नवा पक्ष
हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी शिवसेनेची युती
मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल रूमला पुन्हा आला मेसेज
भाजपाकडून मढ येथील अनधिकृत स्टुडिओची पाहणी
‘शो ग्लिट्स इंव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट’ कंपनीचे संचालक संतोष सिंग यांनी सांगितले की, “बोरिवलीतील नवरात्री उत्सव हे दानधर्म करण्याचे प्रमुख माध्यम आहे. विशेष म्हणजे नवरात्रोत्सवाच्या आयोजनातून मिळणार्या रकमेतील काही भाग हा कर्करोगग्रस्तांना दिला जाणार आहे.”
यावेळी मंचावर खासदार गोपाळ शेट्टी, दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक, शो ग्लिट्स इव्हेंट अँड एंटरटेनमेंटचे संचालक संतोष सिंह, नवरात्रोत्सवाचे शीर्षक प्रायोजक रमेश जैन, आयोजन समितीचे सदस्य विनय जैन, हर्षल लालाजी, जिग्नेश हिरानी, संजय जैन, ऋषभ वसा असे सर्व उपस्थित होते.