देवेंद्र फडणवीस यांनी केला घणाघात
त्रिपुरात न घडलेल्या घटनेनंतर महाराष्ट्रात ५० हजारांचे मोर्चे निघतात हा संयोग नाही तर प्रयोग आहे. यातून टेस्टिंग केलं गेलं आपण दंगे घडवू शकतो का? मोर्चे संपता संपता हिंदूंच्या दुकानांना आगी लावायच्या. मोदींचे सरकार हटवता येत नाही, विकासाच्या मुद्द्यावर त्यांना हरवता येत नाही म्हटल्यावर हा प्रयोग करण्यात आला. तो प्रयोग देशात अराजक निर्माण करण्याकरिता तथाकथित विचारवंत, स्युडो लिबरल, उधारमतवादी करतात. हे प्रयोग संपवावे लागतील. नाहीतर हे फोफावतील. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी ही डावी विषवल्ली पुस्तकातून मांडली आहे. ही विषवल्ली शहरात आहे. त्याचा मुकाबला करावा लागेल, अशा शब्दांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डाव्या विचारसरणीवर हल्लाबोल केला. निमित्त होते सच्चिदानंद शेवडे यांची षष्ठ्यब्दीपूर्ती आणि त्यांच्या ५०व्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. डोंबिवलीत झालेल्या या कार्यक्रमात डावी विषवल्ली या शेवडे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले.
फडणवीस म्हणाले की, सच्चिदानंद शेवडे यांच्या उद्बोधनानंतर अजून कुणी बोलावं असं वाटतही नाही. आणि खरेतर त्यांनी बोललेल्या गोष्टी आपल्या मनात, डोक्यात, विचारांत घोळत राहतात. पण आज त्यांचा सत्कार आहे. सत्काराची संधी मला मिळाली आहे. पुस्तक प्रकाशनाचीही संधी मला मिळाली आहे.
डॉ. शेवडे यांच्या विविध व्याख्यानांना अनेक लोक उपस्थित राहिले असतील, काही प्रत्यक्ष ऐकली असतील तर काही यूट्युबर ऐकली असतील. शेवडे हे भारतीय वीरांचा इतिहास, परंपरांना, संस्कृतीला लोकांसमोर मांडतात खऱ्या अर्थाने ही राष्ट्रसेवा ते करतात. मी राष्ट्रसेवा यासाठी म्हणतो जेव्हा सर्व देशात डावी विषवल्ली डोक्यांत शिरून लोकांमध्ये विष पेरते. आपलं आहे ते खराब आहे, त्याज्य आहे, इतर विचार हेच खरे विचार आहेत अशा प्रकारचा एक भाव तयार करत आहेत, अशा परिस्थितीत तो भाव पराजित करून आपला विचार मांडण्याचं कार्य ते करतात म्हणून त्यांचं कार्य राष्ट्रकार्य आहे. हा राष्ट्रभक्ताचा सत्कार आहे. डाव्या विषवल्लीचा उल्लेख आपण करतो आहोत. साधारणपणे गरीब, आदिवासींची डोकी भडकावून त्यांच्यात विषारी विचारांचं रोपण करून त्यांच्या माध्यमातून हिंसा घडवून नक्षल विचार मांडण्याचा विचार व्हायचा. पण पोलिस, पॅरा मिलिटरीने त्यांचा नायनाट करायचे ठरविले. त्यातही विचार संपला फक्त आतंकवाद, वसुली उरली. तेव्हा डाव्या विचारसणीच्या लक्षात आलं की, आता आदिवासंनी भडकावून चालणार नाही. त्यानंतर त्यांनी नवा नक्षलवाद आणला अर्बन नक्षलवाद. कॅम्पसमध्ये विचारवंतांचा बुरखा घालून वंचितांना मागासवर्गीयांना पकडून समाजाविरुद्ध, राष्ट्राविरुद्ध अराजकाकडे नेणारी मालिका तयार करायची, असा अर्बन नक्षलवाद सुरू झाला. यांच्या चेहऱ्यामागे लपलेला भाव ओळखायला वेळ लागला. कुणी पत्रकार, कुणी विचारवंत, कुणी प्राध्यापक तर कुणी मानवतावादी. पोलिसांनी त्यांचे बुरखे भीमा कोरेगावनंतर फाडले आणि दंगा घडविण्याचं षडयंत्र पोलिसांनी उघड केलं. यांच्याकडे जे साहित्य सापडलं त्यात संपूर्ण भारत पोखरून काढण्याकरिता मोठी स्ट्रॅटजी मिळाली. त्यांना चीनकडून फंडिंग येतंय, भारतविरोधी शक्तींकडून फंडिग होत आहे. पाकच्या आयएसआयकडून निधी मिळत आहे. जेएनयूतर बोलणारे, पुण्याच्या विद्यापीठात बोलतात. जे काश्मीरमध्ये आझाद काश्मीरबद्दल बोलतात, आतंकवाद्यांना मारल्यावर हे नागरिकांना मारल्याचा कांगावा करतात. अशा प्रकारच्या विषारी चेहऱ्याविरुद्ध उभे राहिलो नाही जे बंदूक घेऊन उभे आहेत त्यांना मारणे सोपे आहे, पण जे मनं पोखरत आहेत, मुलं पोखरत आहेत. विचार पोखरत आहे, मुलांची डोकी पोखरत आहे यांना शोधणे कठीण आहे, असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
ऑटिझमच्या मुलांसाठी कौशल्यविकासाचे ‘सोपान’
मिर्झापूरच्या ललितचा मृतदेह आढळला
परमबीर अखेर निलंबित; भत्ते मिळणार पण अन्यत्र नोकरी करता येणार नाही
धक्कादायक!! मुलीचे अपहरण नव्हे तर आईनेच केली हत्या!
त्यांनी पुढे सांगितले की, काल परवाची घटना आहे. अमरावतीला ज्यावेळेस दंगा झाला. त्रिपुरा जे घडलेच नाही त्या घटनेवर डाव्यांनी सोशल मीडियात नरेटिव्ह तयार केला की, सीपीआय एमच्या एका बिल्डिंगला आग लागली तेव्हा मशिदीला आग लागल्याचे सांगितले गेले. कॅम्पला आग लागली, पुस्तके जळली तेव्हा ते चित्र टाकून कुराण जाळलं जातंय असं सांगितलं गेलं. रोहिंग्यांचे फोटो दाखवायचे आणि त्रिपुरात घडले असा कांगावा करायचा. इंदोर किंवा अन्यत्र निघालेल्या रामनवमी शोभायात्रेत हिंदू कसे शस्त्र घेऊन निघालेत हे दाखवायचे. नरेटिव्ह तयार करून मोठ्या प्रमाणात इको सिस्टीम तयार केली. एकाने ट्विट केले की, दुसऱ्याने करायचे. अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत हे दाखवायचे.