पिण्डजप्रवरारुढा चण्डकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यां चन्द्रघण्टेति विश्रुता॥
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘शैलपुत्री’ या रूपाची पूजा केली जाते. तर, दुसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘ब्रह्मचारिणी’ रुपाची आराधना केली जाते. तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘चंद्रघंटा’ रुपाला पूजले जाते. शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस हा देवी ‘चंद्रघंटा’ला समर्पित आहे. भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी ‘चंद्रघंटा’ देवी प्रकट झाली, असे सांगितले जाते.
पौराणिक कथांनुसार, दुर्गा मातेचे पहिले रूप ‘शैलपुत्री देवी’चे आहे आणि दुसरे ‘ब्रह्मचारिणी देवी’चे रूप आहे, जे भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी झाले, असे मानले जाते. जेव्हा ब्रह्मचारिणी देवी भगवान शंकरांना तिचा पती म्हणून स्वीकारते, तेव्हा ती आदिशक्तीच्या रूपात प्रकट होते आणि चंद्रघंटा बनते. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला ‘चंद्रघंटा देवी’ असे म्हटले जाते. पृथ्वीतलावर राक्षसांची दहशत वाढू लागली होती, तेव्हा दुर्गा मातेने ‘चंद्रघंटा’चा अवतार घेतला होता.
एके काळी महिषासुर नावाच्या राक्षसाच्या दहशतीमुळे तिन्ही जगात खळबळ उडाली होती. देवाने दिलेल्या अपार शक्तीमुळे महिषासुर आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून स्वर्गावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होता. स्वर्गातील देवता भयभीत झाले आणि सर्वजण ब्रह्मदेवांकडे गेले. त्यावेळी ब्रह्म म्हणाले की, सध्या महिषासुराचा पराभव करणे सोपे नाही. त्यासाठी आपण सर्वांना महादेवाचा आश्रय घ्यावा लागेल. त्यावेळेस सर्व देव सृष्टीचे निर्माते भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि त्यांची संमती घेऊन ते सर्व महादेवाकडे पोहोचले. राजा इंद्राने महादेवाला आपली समस्या सांगितली. तेव्हा महादेव संतापले आणि म्हणाले की, महिषासुर आपल्या शक्तीचा चुकीच्या मार्गाने वापर करत आहे आणि याची शिक्षा त्याला भोगावी लागेल. त्यावेळी भगवान विष्णू आणि ब्रह्म देखील क्रोधित झाले. त्यांच्या क्रोधातून एक तेज प्रकट झाले आणि या उर्जेतून एक देवी प्रकट झाली. त्या वेळी भगवान शिव यांनी आपले त्रिशूळ मातेला दिले. भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र दिले. इंद्राने घंटा दिली. अशा प्रकारे सर्व देवांनी आपली शस्त्रे देवीला दिली. पुढे देवी ‘चंद्रघंटा’ यांनी महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिले. माता चंद्रघंटा आणि महिषासुर यांच्यात भयंकर युद्ध झाले. या युद्धात महिषासुर देवीपुढे टिकू शकला नाही. त्यावेळी मातेने महिषासुराचा वध करून तिन्ही जगाचे रक्षण केले.
‘चंद्रघंटा’ देवीला दहा हात आहेत. या दहा हातांमध्ये त्रिशूळ, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते.
हे ही वाचा :
पवन कल्याण म्हणतात, सनातन धर्म प्रमाणपत्र हवे!
लाडू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या देखरेखीखाली करणार एसआयटी
पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार, राजेखां करीम पठाणसह तिघांना अटक!
नसरल्लानंतर हिजबुल्लाचा संभाव्य नवा प्रमुख हाशिम सफिद्दीनला टिपले