वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥
देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित असून या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जात असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात.
नवरात्रोत्सव आपण नऊ दिवस साजरा करतो आणि त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्रसुद्धा म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘शैलपुत्री’ या रूपाची पूजा केली जाते. दुर्गेचे पहिले रूप ‘शैलीपुत्री’ या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले.
पौराणिक कथेनुसार, शैलपुत्री मातेला सती असेही म्हणतात. सती ही राजा प्रजापती यांची कन्या. एकदा राजा प्रजापती यांनी मोठा यज्ञ करण्याचे ठरवले होते. यासाठी त्यांनी अनेकांना आमंत्रणे पाठवली पण, त्यांची मुलगी सती आणि भगवान शंकरांना आमंत्रित केले नाही. सतीला तेथे जाण्याची फार इच्छा होती. पण, भगवान शंकरांनी मात्र मला आमंत्रित करण्यात आलेले नाही तर मला जाणे उचित नाही असे सांगितले. परंतु, सती यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली. शेवटी स्त्री हट्ट पुरवत शंकर यांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली.
हे ही वाचा:
भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला
डेन्मार्कमध्ये इस्रायली दूतावासाजवळ दोन स्फोट
इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करून चूक केलीये, आता परिणाम भोगा
हिजबुल्ला- इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील भारतीयांसाठी ऍडवायजरी
सती जेव्हा तिचे वडील राजा प्रजापती यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलले नाही. केवळ आईने सती मातेला प्रेमाने मिठी मारली. पण आपल्या जिवाभावाच्या भावंडांनी अशी वागणूक दिली यामुळे ती दुःखी झाली. भगवान शंकराबद्दलही त्यांनी काही अपशब्द काढले. राजा प्रजापती यांनी देखील आपल्या मुलीशी काही चांगला व्यवहार केला नाही. त्यामुळे सती खूपच नाराज झाली. त्यांना स्वतःचा आणि भगवान शंकरांचा अपमान सहन होत नव्हता. त्यामुळेच रागाच्या भरात सतीने त्याचं यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले. भगवान शंकरांना हे कळताच ते अतिशय दुखी झाले. दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला. त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला. हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव ‘शैलपुत्री’ पडले.
माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहेत. हा नंदी शिवाचे रूप आहे. कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे. शैलपुत्री मातेच्या उजव्या हातातील त्रिशूळ आहे. तर, डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे.