उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन यांनी मेवाडचे शासक महाराणा संग्राम सिंह (राणा सांगा) यांना ‘देशद्रोही’ म्हणत एका वादग्रस्त वक्तव्याने नवीन वादाला तोंड फोडले आहे. शनिवारी राज्यसभेत भाषण देताना, त्यांनी म्हटले की राणा सांगा यांनी इब्राहिम लोदीला पराभूत करण्यासाठी बाबरला भारतात बोलावले होते. हिंदूंना ‘देशद्रोही राणा सांगा यांची संतती’ असे सुमन यांनी संबोधले. यामुळे देशभरात वादविवाद झडत असून राणा सांगा यांचा देदिप्यमान इतिहास यानिमित्ताने वाचला जात आहे. पण त्यातून समोर येणारे सत्य वेगळेच आहे.
काय लिहिले आहे इतिहासात?
काही लोक असा दावा करतात की राणा सांगा यांनी बाबरला भारतात बोलावले होते. मात्र, वास्तविकता वेगळी आहे.
राणा सांगा यांनी आधीच इब्राहिम लोदीला अनेक वेळा पराभूत केले होते. राणा सांगा यांनी गुजरात आणि मालवाच्या सुलतानांनाही अनेकदा पराभूत करून त्यांची संयुक्त सेना देखील हरवली होती. मग त्यांना बाहेरून मदतीची गरज का असावी?
१५०८ मध्ये मेवाडचे शासक बनलेले राणा सांगा यांनी आपल्या आयुष्यात १०० हून अधिक लढाया लढल्या, ज्यामध्ये केवळ खानवा युद्धातच त्यांचा पराभव झाला. त्यांच्या शौर्यामुळे त्यांना ‘हिंदूपत’ हा सन्मान मिळाला. या युद्धांमध्ये त्यांनी एक डोळा, एक हात गमावला आणि एका पायाने लंगडत होते. त्यांच्या शरीरावर ८० पेक्षा जास्त गंभीर जखमांचे व्रण होते. तरीही, त्यांना कोणीही रोखू शकले नाही.
राजपूताना इतिहासाचे अभ्यासक कर्नल जेम्स टॉड यांच्या मते: राणा सांगा यांच्याकडे ८०,००० घोडेस्वार, ५०० हत्ती आणि सुमारे २ लाख पायदळ सैनिक होते. त्यांच्याखाली ७ मोठे राजे, ९ राव आणि १०४ रावल होते. ग्वाल्हेर, अजमेर, सिक्री, रायसेन, काल्पी, चंदेरी, बूंदी, गागरोन, रामपूरा आणि आबूचे राजे त्यांना आपला अधिपती मानत होते. राणा सांगा यांनी दिल्ली, मालवा आणि गुजरातच्या सुलतानांशी १८ मोठ्या लढाया लढल्या आणि त्यांना हरवले. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि उत्तरेकडील गुजरातपर्यंत आपले साम्राज्य वाढवले. १३५० मध्ये पर्मार साम्राज्याच्या पडसादानंतर पहिल्यांदाच त्यांनी मालवात पुन्हा राजपूत सत्ता स्थापन केली.
१५१७ मध्ये राणा सांगा आणि इब्राहिम लोदी यांच्यात ‘खतोलीची लढाई’ झाली. यात राणा सांगा यांनी लोदीला पूर्णतः पराभूत केले. १५१८-१९ मध्ये लोदीने पुन्हा हल्ला केला, पण राजस्थानच्या धौलपूरमध्ये राणा सांगा यांनी त्याला पुन्हा हरवले आणि तो पळून गेला. या युद्धांमुळे इब्राहिम लोदीने राजस्थानमधील आपली सर्व जमीन गमावली.
राणा सांगा यांनी इब्राहिम लोदीला नमविण्यासाठी बाबरला भारतात आमंत्रित केल्याचा असत्य इतिहास पसरवला जात आहे. वास्तविक बाबरने भारतावर स्वारी करण्याचा प्रयत्न १५०३, १५०४, १५१८ आणि १५१९ मध्ये केला, पण त्याला यश मिळाले नाही. राणा सांगा यांनी दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी याला आधीच अनेक वेळा हरवले होते. बाबरला भारतात बोलावणारे पंजाबचे राज्यपाल दौलत खान लोदी आणि इब्राहिम लोदीचा काका आलम खान होते. राणा सांगा यांनी बाबरला बोलावल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही.
हे ही वाचा:
केसरी चैप्टर २’ चा टीझर प्रदर्शित
युनिफाइड पेन्शन योजना १ एप्रिलपासून
न्यूझीलंडने चौथ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानला ठेचले
राणा सांगा यांनी बाबरला बयानाच्या युद्धात हरवले
१५२७ मध्ये बयाना येथे बाबर आणि राणा सांगा यांच्यात युद्ध झाले, ज्यात बाबरची सेना पराभूत झाली आणि तो अपमानास्पद पळ काढून आग्र्याला परत गेला. या युद्धात मारवाडच्या राव गांगा यांचे पुत्र मालदेव, चंदेरीचे मेदिनी राय, मेटराचे रायमल राठोड आणि बऱ्याच हिंदू शासकांनी राणा सांगा यांना साथ दिली होती. पण १६ मार्च १५२७ रोजी आग्र्याच्या पश्चिमेला खानवा येथे बाबर आणि राणा सांगा यांच्यात लढाई झाली. बाबरच्या सैन्याकडे ८०,००० सैनिक होते, तर राणा सांगा यांच्या सैन्यात १ लाख सैनिक होते. बाबरच्या सेनेने प्रथमच बंदुका आणि तोफांचा वापर केला, ज्यामुळे तो विजय मिळवू शकला.
जेम्स टॉड, जी.एन. शर्मा आणि गौरिशंकर हिराचंद ओझा यांसारख्या अनेक इतिहासकारांनी स्पष्ट केले आहे की:
बाबर आधीपासूनच भारत जिंकण्याच्या तयारीत होता. त्याने १५०३, १५०४, १५१८ आणि १५१९ मध्ये भारतावर हल्ले केले होते, पण अपयशी ठरला होता. राणा सांगा यांच्यासारख्या शक्तिशाली शासकाला बाहेरील कुणाचीही मदत घ्यावी लागली नसती. बाबरला पराभूत केल्यानंतर, बाबरनाम्यात स्वतः बाबर लिहितो – “हिंदुस्थानात राणा सांगा आणि दक्षिणेत कृष्णदेवराय यांच्यासारखा मोठा राजा कोणीही नाही.”