उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या अंजुमन इंतेजामिया मशीद या व्यवस्थापन समितीने मशिदीच्या आत व्हिडिओग्राफी करण्याच्या स्थानिक न्यायालयाच्या निर्देशाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार वकिल आयुक्तांच्या देखरेखीखाली ६ मे आणि ७ मे रोजी व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे.
“आम्ही व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षणासाठी कोणालाही मशिदीच्या मैदानात प्रवेश करू देणार नाही. व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षणासाठी मशिदीच्या परिसरात प्रवेश करण्याचा कोणताही प्रयत्न करणे अनैतिक आहे,” असे अंजुमन इंतेजामिया मशिदीचे संयुक्त सचिव एस एम यासीन म्हणाले. तसेच याचे होणारे परिणाम व्यवस्थापन भोगण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.
दिल्लीतील राखी सिंग, लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांनी ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर गणेश, हनुमान आणि नंदी यांची पूजा आणि विधी करण्याची परवानगी मागितल्याप्रकरणी न्यायालयाने १८ एप्रिल रोजी अजय कुमार यांची वकील आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर न्यायाधीशांनी वकील आयुक्तांना त्यांच्या सेवेचे व्हिडिओ फुटेज बनवण्यास सांगितले आणि आवश्यक असल्यास पोलिस विभागाची मदत घेण्यास सांगितले होते.
त्यानुसार, ६ मे आणि ७ मे रोजी त्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफी होईल, असे दोन्ही बाजूंना वकिल आयुक्तांकडून सांगण्यात आले. ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्थापन समितीने यापूर्वी नवीन वकील आयुक्तांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता आणि आता व्हिडीओ काढण्यास विरोध केला आहे. ६ मे रोजी दुपारी ३ वाजता काम सुरू होईल आणि त्याच दिवशी काम पूर्ण न झाल्यास ७ मे रोजी काम होईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.
हे ही वाचा:
जॅकलिन फर्नांडिसच्या संपत्तीवर ईडीची टाच
अमेरिकेतून कुरिअरमधून आणले २७ किलो मारीजुआणा ड्रग्ज; एकाला अटक
MPSC च्या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; रुपाली माने मुलींमध्ये पहिली
‘इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदेत मुंबई महापालिकेचा घोटाळा’
या प्रकरणाची पुढील सुनावणी १० मे रोजी होणार असून, व्हिडीओग्राफी न्यायालयात सादर करायची आहे. ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर शृंगार गौरी देवीची प्रतिमा आहे. रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान बाबरी मशीद पाडल्यानंतर, भक्तांना नियमित प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता आणि या देवतेची पूजा करण्याची परवानगी केवळ चैत्र नवरात्रीच्या चौथ्या दिवशी होती.