बाप्पा आले घरी! सोन्याला झळाळी

बाप्पा आले घरी! सोन्याला झळाळी

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सणाची आजपासून सुरुवात झाली आहे. गणरायाच्या आगमनाने संपूर्ण महाराष्ट्र अगदी फुलून गेला आहे. दोन वर्षाच्या कोरोना महामारीनंतर लोकांनी दणक्यात बाप्पाचं स्वागत केलं आहे. बाप्पाची मनोभावे पूजा करण्यासाठी भक्तांची लगबग सुरु झाली आहे. पण महाराष्ट्रात कोणताही सण असो किंवा कोणतही कार्य सोन्याशिवाय ते अपूर्णच वाटत. मुंबईत सोन्यामध्ये दिवसाला अंदाजे दोनशे कोटींची उलाढाल होते. गणेशोत्सवामुळे हीच उलाढाल आता दुप्पट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. म्हणजे एकट्या मुंबईत या सणामध्ये प्रति दिवसाला चारशे कोटींची उलाढाल होणार असल्याचं मत मुंबईतील झवेरी बाजारातील सराफांनी व्यक्त केलं आहे.

गणरायाला सोन्याच्या दागिन्यांचा साज चढविण्यासाठी दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार झळाळून निघाला आहे. गणेशोत्सवामुळे व्यापार क्षेत्रात एक वेगळाच उत्साह संचारला आहे. बाप्पासाठी, स्वतःसाठी लोकांनी सणाचं निम्मित साधून सोन्या, चांदीच्या दागिन्यांची खरेदी सुरु केली आहे. बाप्पासाठी लागणारे अलंकार मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. बाजरात ग्राहकांची नुसती झुंबड उसळली आहे. मुंबईमध्ये जी दिवसाला सोन्यामध्ये चारशे कोटींची उलाढाल होईल असा अंदाज लावला जातोय तसाच महाराष्ट्रात तब्बल एक हजार कोटींची सोन्यामध्ये उलाढाल होईल असं म्हटलं जातं आहे. सोन खरेदीमध्ये ग्राहकांचा सर्वात जास्त कल हा सोन्याची नाणी किंवा बिस्किटे घेण्याकडे असल्याचं दिसत आहे. कारण दागिने बनवायला जी मजुरी लागते ती नाणी किंवा बिस्किटे खरेदी करण्यात वाचते. भारतातील लोकांची हीच सोन्याची हौस लक्षात घेऊन ब्रिटनच्या नाणे बनवणाऱ्या सरकारी संस्था रॉयल मिंटने गणेश चतुर्थीच्या आधी गणपतीचे चित्र असलेले सोन्याचे बार पहिल्यांदाच तयार केलेत. या कंपनीने वीस ग्रॅमचे बार बनवलेत ज्यावर, गणपतीची रेखीव मूर्ती रेखाटली आहे. ही सोन्याची बिस्किटे या आठवड्यापासून ऑनलाइन विकली जाणार आहेत. गणपतीचे चित्र असलेल्या सोन्याच्या बिस्किटांची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. ही सोनेरी बिस्किट इमा नोबेल नावाच्या डिझायनरने डिझाइन केली आहेत.

सोन्यासह चांदीच्या नाण्यांचीही खरेदी केली जात आहे. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सरकारनेही कोरोनाचे निर्बंध हटवलेत. त्यात आता गणेशोत्सवानंतर नवरात्री दिवाळी असे लागोपाठ सण असल्यानेसुद्धा सोन्याच्या खरेदीत वाढ झाली आहे. सोन्याची नाणी बिस्किटांप्रमाचे बाप्पाचे आवडते मोदकही बनवायला सोन्याचा वापर केल्याचा दिसत आहे. यूपीतील आग्र्यामध्ये एक मिठाईच्या दुकानात बाप्पासाठी सोन्याचे मोदक बनवले जात आहेत. आग्र्यातील शाह मार्केटमध्ये हे मिठाईच दुकान आहे. या लाडूवर २४ कॅरेट सोन्याच वर्ख लावण्यात आलं आहे. हे सोन्याचे मोदक लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत.

सोन्याच्या मोदकांच्या एका लाडूची किंमत पाचशे रुपये, तर एक किलो लाडूची किंमत साडे सोळा हजार रुपये असल्याचे दुकानदार तुषार यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी गणेशोत्सव तेवढ्याच उत्सहात साजरा केला जात आहे. कोरोनापूर्वी सोन्याचा भाव प्रतितोळा ३० ते ३५ हजार तोळा होता आज तोच भाव ५३ हजारांवर पोहचला आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याने हा भाव आणखी वाढेल असं तज्ञांनी सांगितलं आहे. भाव वाढल्याने सोन्याची विक्री कमी होईल असंच म्हटलं जात होत. मात्र, याउलट घडलंय आणखी भाव वाढेल म्हणून सोन्याच्या विक्रीत दीड पटीने वाढ झाली आहे.

Exit mobile version