देशभरात गणपती उत्सवाची धूमधाम सुरू असतानाचं आता तेलंगाणामध्ये गणेश मूर्तीच्या वेशभूषेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. हैद्राबादमधील सिकंदराबाद येथे यंग लिओस युथ असोसिएशनकडून गणपती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या मंडपातील गणपतीच्या मूर्तीच्या वेशभूषेवरून प्रश्न उपस्थित केले जात असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गणपती मूर्तीची वेशभूषा ही पारंपारिक वेशभूषेशी जुळत नसल्याचे फोटोमधून दिसत आहे.
हैद्राबादमधील यंग लिओस युथ असोसिएशनने गणेश उत्सवासाठी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटावर आधारित थीम निवडली होती. यानुसार गणपतीच्या मूर्तीला वस्त्र परिधान करण्यात आली आहेत. अंगावर शेरवानीसारखे वस्त्र असून डोक्यावर गोल टोपी असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गणपतीच्या मूर्तीला परिधान केलेली वस्त्रे पारंपारिक वेशभूषेशी जुळत नसल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सिकंदराबादच्या गणेशोत्सव वादानंतर यावर आयोजकांनी स्पष्टीकरण दिले आहे. आयोजकांनी वादावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, “या उत्सवाची थीम ही चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’वर आधारित होती. आमचा उद्देश कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या नाहीत. थीमची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही. परंतु, आम्ही यावर टिप्पणी करणार नाही. कोणत्याही वादात पडण्याची आमची इच्छा नाही,” असे आयोजकांनी स्पष्ट केले. मूर्ती डिझाइन करणाऱ्या कलाकाराबरोबर झालेल्या संवादाच्या कमतरतेमुळे हा गैरसमज झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या उद्दिष्टांना चुकीच्या पद्धतीने समजून घेण्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न? हल्लेखोर अटकेत
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या पत्रकाराची सॅम पित्रोदांनी मागितली माफी
बांगलादेशी, रोहिंग्यांच्या पाठीशी झारखंड मुक्ती मोर्चा
मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावाने बोगस अटकेच्या नोटीस
यंग लिओस युथ असोसिएशनने हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आवाहन केले आहे. त्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, त्यांच्या हेतूमधून चुकीचा अर्थ काढू नये. गणपती बाप्पाचा उत्सव शांततेत पार पाडायचा असून मूर्तीमध्ये अपेक्षित परिणाम झाला नाही. परंतु, आम्हाला हा विषय वाढवायचा नाही, असे समिती सदस्यांनी सांगितले.