संपूर्ण देशाचं लक्ष आयोध्येतील श्री राम मंदिर निर्माणाकडे लागलेले आहे. श्री राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी म्हणून देशभरातले रामभक्त प्रतीक्षेत आहेत. राम भक्तांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून सर्व रामभक्तांसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. आयोध्येतील हे राम मंदिर भाविकांसाठी लवकरच खुलं होणार आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या बांधकामाची देखरेख करणाऱ्या रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने २२ जानेवारीला अभिषेक करण्याची तारीख जाहीर केली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी यासंबंधी माहिती दिली आहे. अयोध्येतील जन्मभूमी येथे राम मंदिराचा अभिषेक (प्राण प्रतिष्ठा) २२ जानेवारी २०२४ रोजी निवडक १० हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. अभिषेक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराचा तळमजला या वर्षअखेरीस पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
राम मंदिराचे मुख्य पुजारी, आचार्य सत्येंद्र दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सोहळा महिनाभर चालणार आहे. महिनाभर चालणारा हा उद्घाटन सोहळा १४ जानेवारीपासून सुरू होणार असून २२ जानेवारीला अभिषेकाचा मुख्य सोहळा होणार आहे. ट्रस्टने या मंदिराच्या परिसरात भक्तांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे.
प्रख्यात उद्योगपती, कलाकार, सर्व पंथातील धार्मिक नेते, खेळाडू आणि पद्म पुरस्कार विजेते यांना अभिषेक समारंभासाठी आमंत्रित केले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. मंदिर चळवळीसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही या सोहळ्यात आमंत्रित केले जाणार आहे.
सध्या आयोध्येत मोठ्या वेगानं राम मंदिराचं बांधकाम सुरू आहे. हे भव्य मंदिर २०२३ पर्यंत बांधून पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली होती.
हे ही वाचा:
आशियाई स्पर्धेत नेमबाजांचा ‘सुवर्ण’वेध
एनआयएकडून खलिस्तानी- गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा
नाझी सैनिकाचा गौरव; कॅनडाच्या लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा
इराकमध्ये लग्नसोहळ्यात लागलेल्या आगीत १०० ठार
अयोध्येतील राम मंदिर हा समस्त हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. १९५० च्या दशकात विवादित जागेवर मूर्ती सापडल्यापासून ते १९८० च्या दशकात राजीव गांधी सरकारच्या काळात मंदिराचे कुलूप उघडण्यापर्यंत आणि ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशिद पाडल्यापासून ते २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने विवादित जागेवर मंदिर बांधायला दिलेल्या परवानगी पर्यंतचा हा राम मंदिराचा प्रवास आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीही, बाबराने राम मंदिर पाडल्यापासूनच हिंदूंनी अनेक वेळा त्याच जागेवर राम मंदिर बांधण्यात यावं यासाठी मोठा संघर्ष केला. परंतु, २०२१ मध्ये पहिल्यांदा या पवित्र जागेवर राम मंदिराच्या पायाभरणीला सुरवात झाली.