कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण करण्यासाठी १७ मार्च रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा सकल हिंदू संघटना आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना काढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे छत्रपती होते, त्यांच्या नावापुढे छत्रपती हे बिरुद का असू नये, अशी विचारणा करत हिंदुत्ववादी संघटनांनी हे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पुरोगामी, विचारवंतांनी विरोध केला असून त्यालाही उत्तर दिले जाईल, असा निर्धारही हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.
हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट यांनी याबाबत आपली भूमिका मांडली असून हा नामविस्तार का व्हायला हवा हे त्यांनी स्पष्ट केले आहे. हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, खूप दिवसांपासून मनाला ही बाब खटकत होती. विद्यापीठाला नाव आहे शिवाजी विद्यापीठ. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणी सर्वसामान्य व्यक्ती आहेत का? असं एकेरी नाव असणं अपमानास्पद आहे. अनेक वर्षे ज्या सत्ता आल्या भलेही त्यावेळी पुरोगाम्यांचं वर्चस्व असेल पण ६०-६५ वर्षांत तथाकथित सेक्युलरवादींनी काय केले? आज ते विरोध करत आहेत इतके दिवस हा त्यांना अवमान का वाटला नाही? घनवट म्हणाले की, आश्चर्य म्हणजे याबाबत बुद्धिभेद करून म्हटलं जातं की, शिवाजी विद्यापीठचे नाव बदलले तर त्याला संक्षिप्त रूप येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे सीएसएमटी झाल्याप्रमाणे. महाराज हे अभिषिक्त छत्रपती होते. ही सामान्य व्यक्तीला मिळालेली पदवी नाही. त्यांनी उभं आयुष्य स्वराज्यासाठी दिलं त्यांची छत्रपती ही पदवी काढणं आणि त्याठिकाणी आपले मत लादणे हे पुरोगाम्याचें खेळ आहेत. पण आता हे शिवाजी विद्यापीठ नाही तर छत्रपती शिवाजी विद्यापीठच आहे. आम्ही काढलेल्या मोर्चाला हजारोंच्या संख्य़ेने लोक रस्त्यावर उतरतील.
घनवट यांनी माहिती दिली की, १९६२ला एस.आर. तावडे यांच्या अंतर्गत विद्यापीठाच्या नावासाठी एक कमिटी बसली. या कमिटीचे नावच होते छत्रपती शिवाजी महाराज समिती. तत्कालिन निर्णय घेतलाही असेल पण त्यात बदल होऊ शकतो. उस्मानाबादचे धाराशिव झाले, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ झालेला आहे. मग पुरोगाम्याना आता नावबदलाचे वावडे कसले आहे? यांना आमच्या महाराजांचा सन्मान वाढवायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ न करण्यामागे कारण यांना छत्रपती या शब्दालाच विरोध आहे. ती खोड आम्ही मोडणार आहोत.
विद्यार्थी संघटना, हिंदुत्ववादी संघटना या नामविस्ताराची मागणी करणार आहेत. १७ मार्चला दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा दुपारी ३ वाजता निघणार आहे. काल याच पुरोगाम्यांची भाषा काय होती? स्वतःला ते अहिंसावादी म्हणवतात. पण हिंदुत्ववाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ या नावाची मागणी केली तर त्यांना ठोकून काढण्याची भाषा केली आहे, त्यावर कारवाई व्हायला हवी, असेही घनवट म्हणाले.