महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस उत्साहाने, आनंदाने साजरा व्हावा असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात व्हीडिओ जारी करून आवाहन केले आहे की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी आपण साजरी करतो. यंदाही त्याच उत्साहाने साजरी करायची आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीला महापूजा व महाआरती करावी आणि हा सोहळा आनंदात, उत्साहात साजरा करावा.
हे ही वाचा:
प्रियकराचे वैफल्य आईच्या जीवावर
तो आत्महत्या करणार होता,पण पोलिसांनी त्याला वाचवले!
गिरीश बापटांबद्दल राष्ट्रवादीला चिंता का?
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली शपथ
यासंदर्भात महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे की, यंदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने साजरा करणार आहोत. १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर जाऊन पूजा केली जाणार आहे. संध्याकाळी ६.३० वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवकालिन गाव उभे केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपली विश्वात ओळख आहे. शिवजयंतीचा हा उत्साह असाच कायम ठेवत येत्या ६ जून रोजी होत असलेल्या ३५० व्या राज्याभिषेकाला आपण विश्वस्तरावर नेऊ शकतो, अशी विनंती मी महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे करतो.
१९ फेब्रुवारीला महाआरतीच्या आयोजनासोबतच जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर मराठी बाणा व जाणता राजा यांचे खास प्रयोगही ठेवण्यात आले आहेत. शिवजयंतीच्या निमित्त शिववंदना, जन्मोत्सव, महाराष्ट्रीय भोजन, शिवकालीन ग्राम व शिवकालीन बाजार अशा कार्यक्रमांचे आयोजन पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.