ज्ञानी, धर्माभिमानी शीख गुरू गोविंदसिंह

ज्ञानी, धर्माभिमानी शीख गुरू गोविंदसिंह

आज शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांची जयंती आहे. गुरु गोविंदसिंह हे शीख धर्मियांचे दहावे आणि अंतिम गुरु होते. गुरू गोविंदसिंह यांची जयंती शिख समुदायासाठी वार्षिक उत्सव असतो. शीख धर्मीय समुदाय मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करतात. यांच्या जयंतीदिवशी सर्व शीख धर्मीय समुदाय समृद्धीसाठी प्रार्थना करतात.

गुरु गोविंदसिंह हे संत व योद्धा तर होतेच त्यासोबतच ते एक उत्तम कवीसुद्धा होते. त्यांचे संस्कृत व पारशी भाषेवर उत्तम प्रभुत्व होते. त्यांनी कल्प, सर्वलोहप्रकाश, चंडी चरित्र, सुनीतिप्रकाश, ज्ञानप्रबोध, प्रेम सुमार्ग, बुद्धिसागर, विचित्र नाटक आणि गुरु ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथातील काही भाग असे लिखाणही त्यांनी केले होते.

शीख धर्मात केस, लोखंडी कडे, कंगवा, कच्छ व कट्यार हे पंचकन धारण करण्याची प्रथा गुरु गोविंदसिंह त्यांच्यापासूनच सुरु झाली जी आजही पाळली जाते. गुरु गोविंदसिंह यांनी आपल्या शिष्यांना खूप सन्मानाने वागवले. जातपात सोडून फक्त धर्मासाठी सर्वांनी एक व्हावे ही त्यांची विचारसरणी होती. गुरु गोविंदसिंहांनी जो संप्रदाय निर्माण केला त्याचे नाव खालसा असे दिले, खालसा या शब्दाचा अर्थ एकी असा होतो आणि प्रत्येकास सिंह ही पदवी दिली व सिंहासारखे लढावयास शिकवले.

गुरु गोविंदसिंह यांचे बलिदान

माहितीनुसार, मोगलांबरोबर त्यांचे प्रत्यक्षात युद्ध सुरु झाले व मोगलांना प्रत्येक युद्धात त्यांनी प्रत्युत्तर दिले. या युद्धात त्यांची दोन मुले धारातीर्थी पडली. त्याचवेळी गुरु गोविंदसिंह यांच्यावरसुद्धा प्राणघातक प्रसंग आता होता मात्र वेषांतर करून त्यांनी शत्रूस चकवा दिला. पुढे मोगलांनी गोविंदसिंहांच्या आणखी दोन मुलांना क्रूरपणे मारले व गुरु गोविंदसिंह यांची माता गुजरीदेवी यांनाही अटक केली. मात्र त्यांच्या आईने मोगलांच्या अटकेत राहण्यापेक्षा धर्मासाठी प्राण देणे श्रेयस्कर समजून त्यांनी तुरुंगातच आपल्या प्राणाची स्वआहुती दिली.

पुढे गोविंदसिंह महाराष्ट्रातील नांदेडमध्ये स्थलांतर झाले. मात्र शत्रू कायम त्यांच्या मागे होते. एक दिवस त्यांचे शत्रू अताऊल्ला पठाण व त्याचा भाऊ गुलखा पठाण गुप्तपणे नांदेड येथे गुरु गोविंदसिंह राहत असलेली ठिकाणी पोहोचले. त्यांनी गुरु गोविंदसिंह झोपेत असतानाच त्यांच्या पोटात कट्यारीचा वार केला. कट्यार पोटात घुसल्यामुळे गुरु गोविंदसिंह यांना जाग आली व त्यांनी देखील तलवार हातात घेऊन एकाच घावात गुलखा पठाणाचे दोन तुकडे केले. मात्र अताऊल्ला पठाण पळून जाण्यात यशस्वी ठरला. गुरु गोविंदसिंह यांच्यावर झालेला वार हा खोल असल्याने जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊन ७ ऑक्टोबर १७०८ साली वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी गुरु गोविंदसिंह निधन झाले.

आपल्या महान विचारांनी राज्यक्रांती घडवणारे एक अद्वितीय पुरुष म्हणून गुरु गोविंदसिंग यांचे महत्व खूप मोठे आहे.

Exit mobile version