देशातील जुन्या आणि महत्त्वाच्या विद्यापीठांपैकी एक आशा बनारस हिंदू विश्वविद्यालयाने एक अनोखा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम म्हणजे हिंदू धर्मावर आधारलेला एक पदवी अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात प्राचीन हिंदू तत्त्वज्ञान, परंपरा, कला, विज्ञान इतिहास या सर्व गोष्टींवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे देशभर सध्या या नव्या अभ्यासक्रमाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सध्या या नव्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. ७ सप्टेंबर पर्यंत प्रवेश अर्ज पाठविण्याची अंतिम तारिख असून त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी एक प्रवेश परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या सर्वोत्तम अशा ४० विद्यार्थ्यांना या नव्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी हा दोन वर्षांचा असणार आहे.
हे ही वाचा:
उद्योजकांच्या सुरक्षेवरून फडणवीसांनी केली ठाकरे सरकारची कान उघाडणी
स्वरा भास्करच्या अजब तर्कावर अरेस्ट स्वरा वायरल
खादी व ग्रामोद्योग लेहमध्ये फुलवणार हिरवळ
ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?
बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा असा दावा आहे की हा देशातील पहिला वहिला असा हिंदू धर्मातील पदवी अभ्यासक्रम आहे. हिमाचल विश्वविद्यालयात अशाच प्रकारचा एक अभ्यासक्रम चालतो. पण तो पदविका स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे. बनारस हिंदू विद्यापीठात आधीपासूनच इस्लाम आणि ख्रिश्चन विषयांचे अभ्यासक्रम सुरू होते. पण हिंदू धर्मावर आधारित अभ्यासक्रम नव्हता. ज्याचा समावेश आता करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमात परदेशी विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या वैदिक दर्शन विभागाच्या अंतर्गत हा पदवी अभ्यासक्रम संचालित केला जाणार आहे. अभ्यासक्रमात हिंदू धर्माविषयी विस्तृत स्वरूपात शिकवले जाणार आहे. ज्यामध्ये हिंदू परंपरा, संस्कृती, इतिहास यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हिंदू संस्कृतीतील व्यापार, वास्तुकला हिंदू राज्यांची कार्यपद्धती, त्यांची शस्त्रास्त्रे तसेच प्राचीन वेद, शास्त्र या सर्वांविषयी शिकविले जाणार आहे.