24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरधर्म संस्कृती'छत्रपती संभाजी महाराजांबाबतचे 'ते' उल्लेख पुराव्यांच्या कसोटीवर न टिकणारे'

‘छत्रपती संभाजी महाराजांबाबतचे ‘ते’ उल्लेख पुराव्यांच्या कसोटीवर न टिकणारे’

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या रेनिसन्स स्टेट या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराजांविषयीच्या उल्लेखांवरून अवघ्या महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. इतिहासाचे अभ्यासक डॉ. केदार फाळके यांनी यासंदर्भात तथ्यांची मांडणी करत पुस्तकातील ते दावे खोडून काढले आहेत.

Google News Follow

Related

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनिसन्स स्टेट’ या ग्रंथातील छत्रपती संभाजी महाराजांविषयीच्या उल्लेखांविषयी एक पृष्ठ काही मित्रांनी मला पाठविले होते आणि त्या पृष्ठात जो मजकूर आहे त्याबद्दल माझी प्रतिक्रिया विचारली होती. या ग्रंथात गिरीश कुबेर यांनी पृष्ठ क्र. ७६ वर संभाजी महाराजांवर टीका केली आहे. गिरीश कुबेर यांनी असे म्हटले आहे की, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो वारसाचा प्रश्न निर्माण झाला तो सोडविण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात केला. त्यांनी सोयराबाई राणीसाहेब आणि शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या अष्टप्रधान मंत्रीमंडळातील मंत्र्यांना ठार केले. या रक्तपातामुळे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणि पुढे संभाजी महाराजांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली.

हे ही वाचा:

काँग्रेसचे गोडवे गाणाऱ्या देवरांना स्वराज कौशलनी सुनावले

संजय राऊतांची टीका हा निव्वळ पोरखेळ

‘इंडियन व्हेरीअंट’ म्हणणाऱ्या कमलनाथांवर गुन्हा

आदित्य ठाकरे दाखवा आणि फुकट लसीकरण मिळवा

संभाजी महाराजांनी सोयराबाई राणीसाहेबांना ठार मारल्याचा कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. राजाराम महाराजांना गादीवर बसविण्यामध्ये प्रामुख्याने आण्णाजी दत्तोंचा समावेश होता. ते आणि मोरोपंत पिंगळे संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी पन्हाळ्याकडे निघाले असताना वाटेतच हंबीरराव मोहिते यांनी या दोहोंना कैद केले. संभाजी महाराज रायगडास आल्यानंतर त्यांनी स्वतःचे मंचकारोहण करून घेतले. यावेळी मोरोपंत पिंगळ्यांच्या घरावर चौक्या-पहारे बसविले होते. मोरोपंत पिंगळ्यांचा मंचकारोहणानंतर लगेचच मृत्यू झाला. मोरोपंतांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव निळोपंत यांना कैदेतून मुक्त करण्यात आले आणि त्यांची पेशवेपदी नियुक्ती करण्यात आली. आण्णाजी दत्तोंनाही कैदेतून मुक्त करण्यात आले आणि मुजुमदार हे पद देण्यात आले. मे, १६८१ नंतर आण्णाजी दत्तोंनी पुन्हा दुसऱ्यांदा बंडखोर अकबराच्या सहाय्याने संभाजी महाराजांना कैद करण्याचे नियोजन केले. ही गोष्ट संभाजी महाराजांना कळताच त्यांनी कठोर पाऊल उचलत आण्णाजी दत्तोंना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. पुढे संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी नेमलेले अष्टप्रधानच कायम राहिले. त्यामध्ये प्रामुख्याने हंबीरराव मोहिते, रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी, मोरेश्वर पंडितराव यांचा समावेश होता. संभाजी महाराजांच्या राजकीय कारकीर्दीत अष्टप्रधानांच्या उपलब्ध झालेल्या पत्रांवरून अष्टप्रधानांनी किती महत्वपूर्ण विषय हाताळले आहेत याची कल्पना येते आणि अष्टप्रधान व संभाजी महाराज या दोहोंमध्ये असणारा ताळमेळ दिसून येतो. येथे अजून एक गोष्ट ध्यानात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे संभाजी महाराजांची राजकीय कारकीर्द एक-दोन वर्षांची नसून नऊ वर्षांची आहे. त्यामुळे गिरीश कुबेरांनी जे मत मांडले आहे; कर्तबगार मंडळी नाहीशी झाल्याने संभाजी महाराजांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली हे अर्थहीन ठरते.

गिरीश कुबेरांनी पुढे जाऊन असे म्हटले आहे की, शिवाजी महाराजांच्या सैन्याने सामान्य प्रजेवर कधीही अत्याचार केले नाहीत, मात्र संभाजी महाराजांच्या सैन्याने केले. या विधानास कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. शिवाजी महाराजांनी सैन्याने कडक शिस्त पाळावी याकरिता चिपळूणाच्या छावणीस ९ एप्रिल १६७४ रोजी विस्तृत पत्र पाठविले होते. संभाजी महाराजांनी सैन्याने अशीच कडक शिस्त पाळावी याकरिता पाठविलेली दोन पत्रे उपलब्ध आहेत. त्यापैकी पहिले पत्र ६ नोव्हेंबर, १६८० या तारखेचे असून दुसरे पत्र ४ ऑगस्ट, १६८७ या तारखेचे आहे. या दोन पत्रांमधला कालावधी ध्यानात घेणे आवश्यक आहे. येथे या पत्रांमधला संपूर्ण मजकूर न देता दुसऱ्या पत्रातील एकच वाक्य देतो. ते असे, ‘तुम्ही रहदारीस नाहक दरफ्ती करिता. मौजे मजकुरी उपद्रव देऊन धामधूमही करीता. रयतीकडून गैरसनदी मनास येईल ते मागत होता, म्हणोन कळो आले. तरी या गावी धामधूम कराया काय गरज. हे ढंग स्वामीस कैसे मानो पाहातात. याउपरीही बदराहा वर्तणूक केलीया तुमचा एकंदर मुलाहिजा होणार नाही. जो धामधूम करील त्याला स्वामी जिवेच मारतील.’

शिवाजी महाराजांनी प्रजेची जशी पोटच्या लेकरांप्रमाणे काळजी घेतली आणि सरकारातून उदरनिर्वाह चालविण्यासाठी धान्य दिले त्याप्रमाणे संभाजी महाराजांनीही प्रजेला उदरनिर्वाहासाठी सरकारातून धान्य दिले. याची नोंद नीळकंठ पिंगळ्यांनी ३ जून, १६८४ रोजी पाठविलेल्या पत्रात मिळते. त्यांनी कोकणात प्रजेकरिता सागरगडाहून पन्नास खंडी धान्य दिले होते.

गिरीश कुबेरांनी अजून एक टीका करताना म्हटले आहे की, संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांप्रमाणे सहनशीलता नव्हती आणि परराष्ट्रविषयक धोरणही नव्हते. कागदपत्रांच्या कसोटीवर गिरीश कुबेरांचा हा मुद्दाही टिकत नाही. आपण एकटे मुघलांविरोधी लढू शकत नाही याची शिवाजी महाराजांना जाणीव असल्याने त्यांनी कुत्बशाही आणि आदिलशाहीशी एकी केली. संभाजी महाराजांनी अजून एक पाऊल पुढे टाकत या दोन शाह्यांचे पालकत्व स्वीकारले. या गोष्टीस कुत्बशाहाने आदिलशाहास दख्खनी हिंदीतून पाठविलेल्या पत्रातून दुजोरा मिळतो. हा लेख आहे, ग्रंथ नाही, त्यामुळे एक उदाहरण देतो आणि थांबतो. शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी मराठ्यांचे इंग्रजांशी असणारे संबंध ताणले गेले होते तर पोर्तुगीजांशी थोडे मैत्रीपूर्ण संबंध होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांनी मराठ्यांशी युद्ध सुरु केल्याने त्यांच्याशी असलेले संबंध प्रचंड ताणले गेले. अशावेळी प्रसंगावधान राखून संभाजी महाराजांनी इंग्रजांशी तह करीत त्यांच्याशी असणाऱ्या संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणली. पुढे मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केल्यानंतर संभाजी महाराजांनी प्राधान्यक्रम ठरवित मुघलांना तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांशीही तह केला आणि संबंध सुरळीत केले.

अंततः इतिहासासंबंधी कोणतेही विधान करीत असताना ते ऐतिहासिक सत्यासत्यतेच्या कसोटीवर टिकते का हे पडताळून पाहावे लागते अन्यथा त्या विधानास काहीही महत्व उरत नाही. गिरीश कुबेरांनी संभाजी महाराजांच्याबाबत केलेल्या विधानांचे तेच झाले आहे.

संदर्भ :
१) संभाजीकालीन पत्र-सार-संग्रह: संपादक – शं. ना. जोशी
२) इंग्लिश रेकॉर्डस ऑन शिवाजी: संपादक – बॅरीस्टर परांजपे
३) शिवपुत्र संभाजी: लेखक – डॉ. कमल गोखले
४) शिवकालीन पत्र-सार-संग्रह: संपादक – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ
५) छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती: लेखक – डॉ. केदार फाळके

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा