यंदा दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यभरात वेगळाच उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, मुंबईतील मंडळातील गणेश मूर्तींचे आगमन होत असून आगमन मिरवणुकीत भाविकांची गर्दी उसळली आहे. वरळी येथील बाप्पाचे आगमन यंदाच्या वर्षीही अनोख्या पद्धतीने करण्यात आले.
वरळी नाक्यावरील आचार्य अत्रे चौकाजवळील श्री गणेश सेवा मंडळ यंदा शतक महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. या मंडळाच्या आगमन मिरवणुकीत हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीयांमधील ऐक्याचे दर्शन घडले. गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार मंडळाच्या आगमन मिरवणुकीत गणेशमूर्तीचा रथ ओढण्याचा मान यंदाही मुस्लीम बांधवांना देण्यात आला होता.
पूर्वी वरळीची ओळख ही व्यापारी केंद्र म्हणून होती. या परिसरात सामाजिक आणि धार्मिक सलोखा राखला जावा म्हणून सर्वधर्मीय बांधवांनी एकत्र येऊन विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. तसेच सर्वधर्मीय आणि व्यापारी मंडळींनी १९२२ मध्ये श्री गणेश सेवा मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून मंडळाच्या आगमन मिरवणुकीत गणेशमूर्तीची पालखी उचलण्याचा मान मुस्लीम बांधवांना देण्यात येतो.
हे ही वाचा:
निधी देण्यासाठी मिटकरी कमिशन मागतात, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप
लिंक क्लिक करताच ९७ हजार गमावले
श्री गणेश सेवा मंडळाची गणेशमूर्ती रविवारी मोठ्या जल्लोषात मंडपस्थळी आणण्यात आली. या मिरवणुकीत हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यंदा शतकपूर्ती असल्यामुळे मंडळाच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.