कर्नाटकात हिजाब आणि भगवा असा वाद रंगलेला असताना त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. हिजाबच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यातील काही भागात बॅनर लागले असून ‘पहले हिजाब फिर किताब, हर किमती चीज परदे मे होती है’ असे त्यावर लिहिण्यात आले आहे.
त्यामुळे आता हा वाद आणखी विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. येथील विद्यार्थी नेता फारुखी लुखमान याने हे बॅनर लावले असून त्यावर हिजाब घातलेल्या महिलांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
एकीकडे महिलांच्या स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्यांची या बॅनर आणि हिजाबच्या आग्रहाबद्दल भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पुस्तकांपेक्षा हिजाबला प्राधान्य देणे आणि हिजाबमध्ये वावरणाऱ्या मुलींना ‘चीज’ म्हणजे एक वस्तू समजण्याला आता विरोध केला जाणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कर्नाटकात एका महाविद्यालयात हिजाब घालण्यास विरोध करण्यात आल्यानंतर हा वाद उत्पन्न झाला. या मुली हिजाब घालण्यावर अडून राहिल्यानंतर काही मुलांनी भगव्या रंगातील उपरणी घालून महाविद्यालयात प्रवेश केला.
कॉलेजमध्ये हिजाब आणि भगवा स्कार्फ विरुद्धचा वाद होत असताना कॉलेजच्या प्राचार्यांनी हिंदू संघटनांना भगवा स्कार्फ परिधान करण्याची मोहीम मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र, हिंदू संघटना अधिकच आक्रमक झाल्याने कर्नाटक सरकारने कर्नाटक एज्युकेशन ऍक्ट १९८३चे कलम १३३ लागू केले आहे. त्यामुळे सर्वांना सारखाच गणवेश परिधान करावा लागणार आहे. खासगी शाळा स्वतःचा गणवेश निवडू शकणार आहेत. या आदेशामुळे हिजाबचा वाद अधिकच वाढला आहे.
हे ही वाचा:
‘महाराष्ट्र बंद’चा निर्णय महाविकासआघाडीला पडणार महागात?
कर्नाटकात जय श्री राम विरुद्ध अल्ला हू अकबर वाद पेटला
पाच मिनिटांत विकली गेली भारत पाक सामन्याची तिकीटे
भाजप नेते सी टी रवी यांनी म्हटले आहे की, सर्व शाळेत स्कूल युनिफॉर्म अनिवार्य असावा. काँग्रेसने जाणूनबुजून विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यासंदर्भात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाब घालणे हे संविधानानुसारच असल्याचे म्हटले आहे. हिजाब घालण्यास विरोध करणे हे संविधानातील कलमांचे उल्लंघन आहे, असे ते म्हणाले.