शिवरायांचा चालता बोलता इतिहास हरपला!

शिवरायांचा चालता बोलता इतिहास हरपला!

शिवशाहीर बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. गेले काही दिवस त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. गेल्या आठ दशकांपेक्षा जास्त काळ शिवचरित्राचा प्रचार-प्रसार हाच केवळ ज्यांचा ध्यास बनला होता, असा छत्रपती शिवरायांचा चालता बोलता इतिहास कायमचा अबोल झाला. एक धगधगते यज्ञकुंड शांत झाले.
छोट्याशा फायद्यासाठी लोक जिथे आपले विचार, आपला रंग बदलतात अशा काळात केवळ छत्रपती शिवराय हा मंत्र रोमरोमांत भिनलेला हा माणूस किशोर वयापासून महाराजांचा इतिहास धुंडाळत गड किल्ल्यावर पायपीट करत राहिला. इतिहास वेड लावतो असे म्हणतात. बाबासाहेबांना इतिहासाचे वेड होते. या वेडाने त्यांचे अवघे आयुष्य झपाटले होते. त्यांचे इतिहास शिक्षक दत्तात्रय माजगावकार यांनी त्यांना इतिहासाचे वेड लावले. थोरल्या बंधूंनी गडकिल्ल्यांचे. पुढे त्यांनी ही भटकंती एकाकी सुरू ठेवली.

सह्याद्रीच्या कडेकपारीत, गर्द जंगलात, उजाड माळरानात दडलेल्या, दबलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत ते तब्बल २० वर्षे भटकत राहिले. शिवाजी हा तीन अक्षरी मंत्र त्यांच्या श्वासात बसला होता. त्यातूनच राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकारला. महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या या ग्रंथाची पारायणे करत मोठ्या झाल्या. हे पुस्तक वाचताना ज्याचे रक्त सळसळले नाही, असा एखादा अभावानेच सापडावा. रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेल्या हिंदवी स्वराज्याच्या शपथेचा प्रसंग असो वा प्रताप गडावर अफजल खानाचा कोथळा काढण्याचा प्रसंग, तुम्हाला थेट तिथे नेऊन उभे करण्याची ताकद त्यांच्या शब्दांत होती.
ज्यांनी हे पुस्तक वाचले छत्रपतींचे नाव कायम त्यांच्या हृदयात कोरले गेले. एकेक शब्द शिवप्रेमाने भारलेला, एकेक ओळ महाराष्ट्र धर्माच्या अभिमानाने ओथंबलेली. इतिहास डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद असलेली अलंकृत भाषा. एकेक शब्द जणू माणिक-मोती. राजा शिवछत्रपती या पुस्तकाने इतिहास घडवला. धर्मनिरपेक्षवादाच्या नावाखाली शालेय पाठ्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आक्रसत जात असताना या पुस्तकाने हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवछत्रपतींच्या भगव्या झेंड्याखाली मराठ्यांनी दिलेल्या लढ्याचा इतिहास जिवंत ठेवला. सातत्याने नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. जे इतिहास विसरतात, त्यांचे भविष्य अंधकारमय असते. बाबासाहेबांसारख्यांनी इतिहास जिवंत ठेवण्याचे काम केले. वर्षे लोटली पण मराठी मनावर असलेले या पुस्तकाचे गारुड किंचितही कमी झाले नाही.

एका बाजूला लेखणीने शिवोपासना सुरू असताना पायाला भिंगरी लावून हा माणूस शिवआख्यान करण्यासाठी उभ्या महाराष्ट्रात फिरत राहिला. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप… हे समर्थ रामदासांचे शब्द त्यांच्या आयुष्याचे उद्दीष्ट होते, हेच त्यांचे कर्म आणि हेच आयुष्याचे सार. त्यांनी शिवचरीत्र लिहिले ते हृदयातून, सांगितले ते हृदयातून. शिवकल्याण राजा ही ध्वनीमुद्रीका जेव्हा बाजारात आली तेव्हा त्यात लताबाईंच्या आवाज आणि त्यांच्या गाण्याआधी बाबासाहेबांची प्रस्तावना होती. लताबाईंचा आवाज ऐकून जसे अंगावर रोमांच उभे राहात तसेच रोमांच बाबासाहेबांचे शब्द ऐकून.

शिवचरीत्र लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. छत्रपती शिवाजी हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत, त्यांना पूजणारे अवघ्या हिंदुस्तानात आहेत याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. त्यांचा इतिहास अवघ्या देशाला माहीत व्हावा या ध्यासाने ते झपाटले त्यातून ‘जाणता राजा’ हे महानाट्य साकारले. हा नाट्यप्रकार अदभूत होता. नेहमीची नाटके होतात त्या रंगमंचावर त्याचा आवाका मावणारा नव्हता. जिवंत हत्ती, घोडे, पालख्या, शेकडो नाट्यकर्मी असे या महानाट्याचे स्वरूप होते. प्रकरण एकदम खर्चिक, परंतु महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या नाट्याला त्यांच्या इतिहासासारखीच झळाळी हवी या विचाराने बाबासाहेब झपाटले. त्यांनी हे शिवधनुष्य एखाद्या तरुणाच्या तडफेने पेलले. देशभरात या महानाट्याचे प्रयोग केले. ‘जाणता राजा’च्यानिमित्ताने शिवरायांचा इतिहास हिंदुस्तानाच्या मातीत पुन्हा जिवंत केला. या महानाट्याचे प्रचंड कौतुक झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे चिरंतन स्मरण देशाला तारु शकते ही जाणीव असल्यामुळे त्यांनी नव्या पिढीसोबत हातमिळवणी केली. अनेक तरुणांसोबत त्यांनी छत्रपतींचा इतिहास सांगणाऱ्या कार्यक्रमाची गुंफण केली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी मिलिंद वेर्लेकर या तरुणाने शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी पुण्यातील गणेश क्रीडा केंद्रात शिवरायांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. छत्रपतींची राज्याभिषेक पहाटे पाच वाजता झाला म्हणून बाबासाहेबांच्या सांगण्यावरून कार्यक्रमाची वेळही पहाटे पाचची ठेवली. बाबासाहेब तिथे स्वत: ४.४५ वाजता हजर होते. दिवस होता २८ जून २००७.

अनेक तरुणांच्या हाती बाबासाहेबांनी शिवप्रेमाची ही मशाल दिली. पद्मश्री राव या तरुणीने बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवरुद्राचे तांडव या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग केले. प्रसाद महाडकर, मंदार कर्णिक यांच्यासोबत जीवन गाणीच्या बॅनरखाली शिवप्रेमींसाठी गाण्यांचे कार्यक्रम केले. बाबासाहेबांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात पु.ल.देशपांडे यांच्या शब्दात त्यांना एक मानपत्र अर्पण करण्यात आले होते. त्या मानपत्रात पु.लं. म्हणतात…
सर्वत्र निराशा, सर्वत्र अपेक्षाभंग, सर्वत्र ध्येयहीतना असल्या काळात आपल्या अभ्यासिकेतील दिवा मात्र रात्र उलटून गेली तरी जळत होता. भोवती महागाईची खाई पेटलेली, पण आपण पानात पडलेल्या चतकोराला पक्वान्न मानून शिवचरित्राच्या लेखनात रंगला होतात. जेथे जेथे शिवरायांचे चरण उमटले त्या त्या ठिकाणी यात्रा करीत होतात. जीवाची तमा न बाळगता गडकोट चढत होतात, शिवचरित्राच्या ध्यासात रानावनांतील काट्याकुट्यांची आपल्या पायदळी जणू मखमल होत होती.
पुलंसारख्या महान लेखकाने ज्यांच्या आरत्या ओवाळल्या त्यांच्या उंचीची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.
बाबासाहेबांवर उधळलेली फुलं त्यांनी स्वीकारली, पदरी पडलेले काटेही पवित्र मानून घेतले.

 

हे ही वाचा:

एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो

…आणि ६३ वर्षीय मिनती यांनी केली घर, संपत्ती रिक्षावाल्याच्या नावे

अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’

 

१९९९ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर राज्यात मराठा-विरुद्ध ब्राह्मण असा विखार पेटवण्याचा प्रयत्न झाला. ज्या बाबासाहेब पुरंदऱ्यांनी सर्वात पहिल्यांदा जेम्स लेन याच्या ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकाचा निषेध केला त्यांच्यावर केवळ ब्राह्मण म्हणून टीकेचे शेणगोळे फेकण्यात आले. उतारवयात त्यांच्या घरावर निषेध मोर्चे काढण्यात आले. त्यांचे पुतळे जाळण्यात आले. भाजपाचे सरकार आल्यानंतर त्यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाला. किंग्जसर्कलच्या षण्मुखानंद सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्होरक्यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला. अखेर हा कार्यक्रम राजभवनात करावा लागला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बाबासाहेबांवर स्तुतीसुमने उधळणारा एक जुन्या भाषणाचा व्हीडीओ दाखवण्यात आला.

आयुष्यभर छत्रपतींच्या इतिहासाचा भंडारा उधळणाऱ्या एका निस्सीम शिवभक्तालाही हा जाच चुकला नाही. परंतु बाबासाहेब डगमगले नाहीत. ना झुकले, ना वाकले, त्यांनी घेतला वसा सोडला नाही, टाकला नाही. त्याच जोमाने उत्साहाने ते शिवचरित्राचा प्रसार करीत राहिले. बाबासाहेबांच्या मृत्यूची बातमी जाहीर झाल्यानंतर शरद पवारांनी दिलेली एक प्रतिक्रिया त्यांची मानसिकता दर्शवणारी आहे. बाबासाहेबांच्या शिवचरित्रातील काही भाग वादग्रस्त होता, असे मत पवारांनी व्यक्त केले आहे. एखाद्या तपस्वी पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दल अशी जळजळ आणि आकस व्यक्त करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. परंतु बाबासाहेबांच्या नशीबी मृत्यूनंतरही ही जळजळ आली. परंतु त्यांचे कार्य या कोत्या मानसिकतेने आणि विचारांनी झाकोळले जाईल इतके क्षुल्लक नाही. त्यांनी पेटवलेल्या मशालीने अनेकांची आयुष्ये उजळलेली आहेत. भविष्यातही त्यांचे साहित्य हे कार्य करत राहील. शिवतेजाने उजळलेल्या या दैदिप्यमान आयुष्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version