आपल्या ओघवत्या वाणीने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अवघ्या महाराष्ट्राला कथन करणारे महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या १००व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिवचरित्राच्या अभ्यासाचा एक बहुमोल दुवा हरपला आहे, अशी भावना इतिहासतज्ज्ञ, बाबासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या अनेक इतिहासप्रेमी, गडप्रेमी, शिवप्रेमींनी व्यक्त केली. अफाट स्मरणशक्ती, संयम, चिकाटी, संशोधक वृत्ती, वक्तृत्व, शब्दसामर्थ्य हे बाबासाहेबांची गुणवैशिष्ट्ये होती. गेले दोन आठवडे ते दीनानाथ रुग्णालयात दाखल होते. रविवारी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांकडून मिळाली. नुकतीच त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली तेव्हा त्यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला होता.
न्यूमोनियाचा त्यांना त्रास होता आणि काही दिवसांपूर्वी तोल गेल्याने पडल्यामुळे त्यांना दुखापतही झाल्याचे कळते. त्यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांचे निधन झाले.
उपचारा दरम्यान १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सकाळी ७.३० वाजता त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल, तर १० वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात चिरंजीव अमृत आणि प्रसाद तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे. त्यांच्या सर्वच परिवाराने वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक कमावला आहे.
बाबासाहेबांच्या जाण्याने प्रचंड व्यासंग, उत्साहाचा धबधबा आता थांबला आहे. भव्यदिव्य अन् हिमालयाहून अधिक उंचीचे एकाहून एक सरस असे उपक्रम अखेरच्या महिन्यापर्यंत करणारी प्रेरणाज्योत विझल्याने सह्यगिरीतील गडेकोट अन दऱ्याखोऱ्या सुन्न झाल्या. देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते.
हे ही वाचा:
‘महाआघाडी आणि रझा अकादमीच्या नेत्यांना ठाकरे पवार सरकारकडून अटक का नाही?
सीबीआय, ईडी प्रमुखांचा कार्यकाळ वाढणार
त्रिपुरात कोणत्याही मशीदिची तोडफोड, नुकसान झालेच नाही
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित राजा शिवछत्रपती ग्रंथांची निर्मिती बाबासाहेबांनी केली. जाणता राजा हा भव्य नाट्यप्रयोगही त्यांनी उभा केला. त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. केवळ महाराष्ट्रातच नाहीतर देशाच्या कानाकोपऱ्यात बाबासाहेब यांचे चाहते आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात बाबासाहेब आणि त्यांनी लिहिलेले शिवचरित्र यांची नेहमीच चर्चा होत असते. बाबासाहेब यांनी सुरुवातीला शिवव्याख्याते म्हणून सुरुवात केली होती. त्यांच्या शिवचरित्राला अवघ्या महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला.
अनेक मुलाखतींमधून त्यांनी उत्साहाने दीड-दीड तास आपले मनोगत व्यक्त केले होते. तसेच दसऱ्याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमासही ते प्रमुख पाहुणे होते. मात्र २६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
माधुरी या ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि गायिका आहेत. ज्येष्ठ चिरंजीव अमृत हे पुरंदरे प्रकाशनची जबाबदारी समर्थपणे सांभाळतात तर, लहान चिरंजीव प्रसाद यांनी नाट्य तसेच दुचाकींच्या क्रीडा प्रकारात काम केले आहे. समाजप्रिय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा संपर्क अनेक क्षेत्रांशी असल्याने केवळ पुण्यातीलच नव्हे तर देशातील त्यांच्या हजारो जणांना धक्का बसला आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असे होते. पुण्याजवळच्या सासवड येथे २९ जुलै १९२२मध्ये त्यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जवळपास १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत.शिवकालीन ऐतिहासिक दस्तावेजांचा त्यांनी अभ्य़ास केलेला आहे.
बाबासाहेबांनी ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक असे प्रदीर्घ लेखन केले. ललित कादंबरी, नाट्यलेखन, जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. २०१५मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण, तर २०१९मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जाणता राजा नाटकाचे त्यांनी १२५० प्रयोग केले.
लहानपणापासूनच म्हणजे अवघ्या सहाव्या वर्षापासून ते वडिलांसोबत किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यासाठी जात असत. सायकल, पायी, रेल्वे, जलमार्ग अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रवास करत ते इतिहासाचे संशोधन करत. त्यांच्या प्रेरणेतून अनेक शिवभक्त, गडप्रेमी तयार झाले. बाबासाहेबांनी राष्ट्रभक्ती जागविली. इतिहासाचे वेड तरुणांमध्ये निर्माण केले. त्यातूनच प्रेरणा घेऊन असाच इतिहासाचा धांडोळा घेणारे अनेक तरुण तयार झाले.
बाबासाहेबांचे साहित्य: आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, पुरंदऱ्यांची नौबत, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजऱ्याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, शेलारखिंड. सावित्री.