मुंबईतील कांदिवली भागातील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये शुक्रवार, १६ जून रोजी सकाळी प्रार्थनेनंतर अजान लावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर या गोष्टीला काही पालकांनी विरोध केला. तसेच, शिवसेनेने शाळेविरोधात कांदिवली पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शाळेने अशाप्रकारे लाऊड स्पीकर अजान यापुढे लावू नये असं पत्राद्वारे लेखी स्वरूपात शिवसेनेकडून देण्यात आले आहे.
शिवसेनेनंतर भाजपा आमदार योगेश सागर यांच्यासोबत शाळेजवळ कार्यकर्त्यांची गर्दी केली. कपोल शाळेबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जय श्री राम आणि दुर्गा बन तू काली बन कभी ना बुरखा वाली अशा घोषणा देत विरोध केला. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून यासंदर्भात योग्य कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी आश्वासन दिले आहे.
शाळेच्या म्हणण्यानुसार, ‘आमच्या शाळेत प्रत्येक धर्माच्या प्रार्थना विद्यार्थ्यांना समजाव्यात म्हणून त्या लाऊड स्पीकरवर लावल्या जातात. त्यामध्ये गायत्री मंत्र, कॅरोल सिंगिंग किंवा मग इतर धर्मियांच्या प्रार्थना असतील त्या विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी हा उपक्रम असतो. यामध्ये आज लाऊड स्पीकर अजान लावण्यात आली. मात्र, पालकांच्या भावना लक्षात घेता आम्ही अजान बंद केली. पालकांचं म्हणणं आम्ही ऐकून घेत आहोत. आता यापुढे अशाप्रकारे आम्ही शाळेत आजान लावणार नाही असं आम्ही सर्वांना आश्वासन देत आहोत.’
हे ही वाचा:
मुलुंड रेल्वे बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित कॅनडातून ताब्यात
कुपवाडामध्ये पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा
शीतल कारुळकर यांना नालंदा नृत्य कला महाविद्यालय गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदाचा बहुमान
आंदोलक कुस्तीपटूंविरोधात दिल्ली पोलिस गुन्हे मागे घेणार
आमदार योगेश सागर म्हणाले की, या शाळेच्या आजूबाजूला एकही मशीद नाही, या शाळेत मुस्लीम समाजातील एक-दोन मुले शिकत असतील, मात्र शाळेच्या आत ध्वनिमुद्रित अजान वाजवणे आम्ही कदापी सहन करणार नाही, ज्या शिक्षकाने वाजवले आहे, त्याला निलंबित करावे अशी मागणीही त्यांनी केली होती. दरम्यान, ज्या शिक्षिकेने अजान लावली होती, तिला निलंबित करण्यात आल्याची माहिती शाळेकडून देण्यात आली आहे.