अयोध्येतील राम मंदिर सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्येसह देशभरात सध्या सुरू आहे. भुतोनभविष्यती असा सोहळा करण्यासाठी म्हणून अयोध्येतील रस्ते, चौक सर्व सजविण्यात आले आहेत. राम लल्लांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीची जबाबदारी काही लोकांवर सोपविण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील विश्व हिन्दू परिषदेचे क्षेत्र संपर्क प्रमुख (महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश) संजय ढवळीकर यांचा समावेश आहे. हे सध्या अयोध्येमध्ये मंदिर आणि मंदिर परिसर सजावटीच्या कामाची जबाबदारी पार पाडत आहेत. सध्या अयोध्येतील मंगल आणि राममय वातावरणाबद्दल सांगत त्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी कुठपर्यंत आली आहे, याची माहिती दिली आहे.
प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेची तयारी आणि मंदिराची सजावट याची देही याची डोळा पाहत असून सर्वांच्या मनात आज कृतकृत्य झाल्याची भावना आहे, असं वर्णन त्यांनी केलं आहे. “कारसेवेच्या वेळी सर्व समाज हा कारसेवक झाला होता आणि आपण काही जण त्या समाजाचे प्रतिनिधीत्व करत होतो. आज आपण सर्व भरून पावलो,” अशा भावना संजय ढवळीकर यांनी व्यक्त केल्या आहेत.
२२ जानेवारी रोजी होणाऱ्या मंदिर आणि मंदिर परिसराची सजावट करण्याची जबाबदारी सध्या संजय ढवळीकर यांच्याकडे आहे. भव्यदिव्य सोहळ्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे संजय ढवळीकर यांनी सांगितले आहे. सध्या मंदिराच्या आंतरिक आणि बाह्य सजावटीचे काम जोरदार सुरू आहे.
या सोहळ्याला देशभरातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधान, सरसंघचालक, राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे मार्ग तसेच पंतप्रधान यांची VVIP ग्रीन रूम याचे सजावट करण्याचे कामही दुसरीकडे सुरू आहे.
याशिवाय हजारोच्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. त्याची सजावट, सर्व संतवृंद, अतिविशिष्ठ आणि विशिष्ठ व्यक्ती यांची बैठक व्यवस्था याकडेही लक्ष देण्यात येत आहे. संपूर्ण मंदिर परिसर सजावट म्हणजेच सप्तर्षी मंडपम, शेषावतार मंदिर, यज्ञशाळा आणि कुबेर नवरत्न याच्याही सजावटीचे काम सध्या सुरू असल्याची माहिती संजय ढवळीकर यांनी दिली.
मंदिराची आणि मंदिर परिसराची सजावट करताना विविध थीम्सवरही काम केले जात आहे. या सजावटी मध्ये सप्तकांड, बालराम ते मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम, रामराज्य, शरयू घाट, भारतामधील सर्व प्रमुख आणि प्राचीन मंदिरे, रामजन्मभूमी आंदोलनाचे शिल्पकार अशा विविध आणि अनोख्या थीम्सची चित्रे लावण्यात येणार आहेत. ही साधारण १२०० ते १५०० चित्र असणार आहेत. विशेष मधुबनी किंवा मिथिला पेंटिंग्स, विविध पॅनेल्स, सुंदर आणि सुबक डेकॉर एलिमेंट्स, इत्यादीचा सजावटीमध्ये वापर केला गेला आहे, असं संजय ढवळीकर म्हणाले. याशिवाय उत्खननात मिळालेल्या मंदिर अवशेषांचे देखील प्रदर्शन साकार केले जात आहे. यामुळे भाविकांना हे मंदिर अवशेष पाहता येणार आहेत. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात दीपोत्सव देखील साजरा होणार आहे.
हे ही वाचा:
सानिया मिर्झाशी वेगळा झाल्यावर शोएब मलिकचे तिसरे लग्न
कोणी जावो अथवा न जावो, राम मंदिर सोहळ्याला मी जाणार!
अयोध्येतील सोहळ्याचे ‘त्या’ पाच न्यायाधीशांना निमंत्रण
राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी रिलायन्स उद्योगाकडून सुट्टी जाहीर
मंदिरातील पूर्ण सजावट ही फुलांनी केलेली आहे. विविध प्रकारच्या आकर्षक आणि रंगीत फुलांनी मंदिर सुंदर पद्धतीने सजवले आहे. याशिवाय परिसरातील रस्त्यांवर विविध फुलांच्या रांगोळ्या रेखाटल्या आहेत, असंही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे अशा संजय ढवळीकर यांनी सांगितले.