अयोध्येतील राम मंदिराखाली आढळले पुरातन अवशेष

श्री राम मंदिर ट्रस्टचे महासचिवांकडून मूर्ती आणि स्तंभांचे अवशेष मिळाल्याचा फोटो पोस्ट

अयोध्येतील राम मंदिराखाली आढळले पुरातन अवशेष

उत्तर प्रदेशात शरयू नदीच्या काठावर वसलेले अयोध्या शहर ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी आणि हिंदू धर्मीयांसाठी तीर्थस्थान आहे. या अयोध्येमध्ये सध्या प्रभू श्री रामांच्या मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. २०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिराच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर हे मंदिर आकार घेतं आहे. अशातच अयोध्येतील श्रीराम मंदिराखाली अनेक पुरातन मूर्ती आणि स्तंभ मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

श्री राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. मंदिरासाठी खोदकाम सुरू असताना या मूर्ती आढळल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. चंपत राय यांनी सध्या याबाबत अधिकची माहिती दिलेली नाही. मात्र, त्यांनी आढळून आलेल्या मूर्तींचे आणि स्तंभांच्या अवशेषांचे फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्ट केलेल्या फोटोमधून हे एखाद्या मंदिराचे अवशेष असल्याचं दिसून येत आहे.

‘लाईव्ह हिंदुस्तान’ने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिरात येणाऱ्या भाविकांना हे पुरातन अवशेष पाहता येणार आहेत. यासाठी हे अवशेष एका विशेष गॅलरीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. सोबतच याबाबत अधिक माहिती देखील देण्यात येणार आहे.

श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा पुढील वर्षी १५ ते २४ जानेवारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर, साधारणपणे २४ ते २५ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे. श्री राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ च्या १५ ते २४ जानेवारीदरम्यान मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होईल. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर ही प्रतिष्ठापणा करण्याचं उद्दिष्ट आहे. पाच वर्षांच्या बालकाच्या रुपातील श्रीरामांची मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी हे मंदिर खुले होणार आहे.

हे ही वाचा:

जवानाचे रक्षण करताना सहावर्षीय लष्करी कुत्र्याचा मृत्यू

संशयास्पद चिनी बॅगवरून १२ तासांचे नाट्य

डीएमकेने स्पष्टच सांगितले की, सनातन धर्म नष्ट करणे हाच इंडी आघाडीचा उद्देश

ऋषी सुनक यांनी एकनाथ शिंदेंना भन्नाट किस्सा ऐकवला!

यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम कामे पूर्ण केली जाणार आहेत. जवळपास शंभर एकर परिसरावर उभारण्यात येणारं हे राममंदिर जमिनीपासून २५ ते ३० फूट उंचावर आहे. या जागेच्या खाली खोल पाया घालण्यात आला आहे. कमीत कमी हजार वर्ष तरी या मंदिराच्या बांधकामाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.

Exit mobile version