अनंत अंबानींकडून जगन्नाथ मंदिर, कामाख्या देवी मंदिरांना पाच कोटी

अनंत अंबानींकडून जगन्नाथ मंदिर, कामाख्या देवी मंदिरांना पाच कोटी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय हे अत्यंत धार्मिक असून हे अनेकदा दिसून आले आहे. अनेकदा अंबानी कुटुंबीय विविध मंदिरात दान करत असतात. अशातच मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी कोट्यवधी रुपयांची देणगी भारतातील दोन मंदिरांना दिली आहे. दोन्ही मंदिरांमध्ये त्यांनी रामनवमीच्या दिवशी तब्बल पाच कोटी रुपयांचं दान केलं आहे.

अनंत अंबानी यांनी पुरी येथील जगन्नाथ मंदिराला भेट देत त्यांनी मोठी रक्कम दान केली आहे. वृत्तानुसार अनंत अंबानी यांनी पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरात २.५१ कोटी रुपये दान केले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा झेड प्लस सुरक्षेसह ते जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते.

जगन्नाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अनंत अंबानी हे आसामला रवाना झाले. तिथे त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेत कामाख्या देवीच्या मंदिरातही त्यांनी २.५१ कोटी रुपये दान केले. या दान केलेल्या रकमेबद्दल अंबानींकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र, सोशल मीडियावर या वृत्ताच्या चर्चा आहेत. अंबानी कुटुंबीयांनी याआधीही अनेक मंदिरांमध्ये दान केलं आहे. मुकेश अंबानी यांनी केदारनाथ-बद्रीनाथ मंदिरात पाच कोटी रुपये दान केले होते. ऑक्टोबर २०२० मध्ये अनंत यांनीच चार धाम देवस्थान मॅनेजमेंट बोर्डाला पाच कोटी रुपये दान केले होते.

हे ही वाचा:

रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर!

२१ राज्यांतील १०२ जागांवरील प्रचार थंडावला!

रवी किशनची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेविरुद्ध पत्नी प्रीती शुक्ला यांची तक्रार!

गुजरातला नमवून दिल्ली विजेते!

अनंत अंबानी हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळेही चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात जामनगरमध्ये अंबानींकडून मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाला तारे-तारकांनी उपस्थिती लावली होती. बॉलिवूडच नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकारांनीही या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म केलं होतं. जामनगरमध्ये त्या तीन दिवसात जवळपास ३५० विमामांनी ये-जा केली होती.

Exit mobile version