मुंबईतील गणेशोत्सव आणि विशेष म्हणजे विसर्जन मिरवणूक म्हटलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते लालबाग, परळ भागातील भव्य- दिव्य अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि या मिरवणुकींमध्ये जमलेले लाखो गणेशभक्त. चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, तेजुकाय अशा अनेक गणपती बाप्पांच्या मिरवणुका मुंबईच्या गल्लीबोळातून मार्ग काढत गिरगाव चौपाटीकडे रवाना होतात. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत, पुढच्या वर्षी लवकर या असं आश्वासन घेत लाखो गणेश भक्त या मिरवणुकांमध्ये सहभागी होतात. या मिरवणुकांना गिरगाव चौपाटीवर यायला आणि बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन व्हायला अनंत चतुर्दशीनंतरचा दुसरा दिवस उजाडतोचं. मात्र, तरीही गणेश भक्तांचा उत्साह कुठेही कमी झालेला दिसत नाही.
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी प्रमाणे यंदाही लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. गिरगाव चौपाटीवर लोकांनी लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला गर्दी केली होती. ही शान कोणाची लालबागच्या राजाची, लालबागच्या राजाचा विजय असो अशा जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. मंगळवारी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक बुधवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर दाखल झाली. यानंतर अतिशय भावपूर्ण वातावरणात लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर लोटली होती.
हे ही वाचा:
लेबनॉनमध्ये स्फोट झालेले तैवान निर्मित पेजर्स युरोपियन कंपनीने बनवले
डोनाल्ड ट्रम्प घेणार पंतप्रधान मोदींची भेट; मोदी ‘फँटास्टिक नेते’ म्हणत काढले गौरवोद्गार!
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांकडील हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट
जम्मू- काश्मीर: १० वर्षांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
मुंबईतील लालबागमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाची आरती करून मिरवणुकीला सुरूवात झाली. पारंपारिक वेषात भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. यावेळी ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष यामुळे या परिसराला वेगळीच शोभा आली होती. या भक्तिमय वातावरणात बाप्पाची मिरवणूक तब्बल २३ तास सुरू होती. पुढे यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेऊन निरोप दिला गेला. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसोबतच प्रशासकीय यंत्रणांनी उपाययोजना केल्या होत्या.