सक्तीने धर्मांतरणाच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत असताना मुंबईत मिरा रोड येथे असाच एक प्रकार बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना उधळून लावला. ख्रिश्चन धर्मियांकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करून धर्मांतरणाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात येत होता. प्रभू येशूची प्रार्थना आणि प्रेरणादायी विचार मांडण्यासाठी या कार्यक्रमाच्या आयोजनाची परवानगी घेण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. पण प्रत्यक्षात तिथे धर्मांतरण सुरू असल्याचा आरोप केला गेला. त्या कार्यक्रमस्थळी बाथ टब ठेवण्यात आल्याचे व्हीडिओत दिसत होते. त्या टबात पाणी ठेवण्यात आले होते आणि त्यात पाव बुडवून खाण्यास सांगण्यात येत होते, असाही आरोप केला गेला.
यासंदर्भात डीके न्यूजने दिलेल्या बातमीनुसार मिरा रोड पोलिस ठाण्याचे डीसीपी प्रकाश गाय़कवाड यांनी याबाबत सांगितले की, मिरा रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत या तीन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यात सक्तीने धर्मांतरण केले जात असल्याचा आरोप काही लोकांनी केला होता. त्या धर्तीवर आम्ही चौकशी करत आहोत. हा कार्यक्रम ख्रिश्चन धर्मियांचा होता. त्याबाबतची रूपरेषा त्यांनी दिली होती.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर बजरंग दल, विहिंपच्या कार्यकर्त्यांनी धर्मपरिवर्तन बंद करा, जय जय श्रीरामच्या घोषणा देत या कार्यक्रमस्थळी संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी कार्यक्रमस्थळी जात पाहणी केली, तेव्हा त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पाण्याने भरलेले बाथ टब ठेवण्यात आल्याचे दिसले. नंतर कार्यक्रम थांबवून त्यातील उपस्थितांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. जवळपास ४० पेक्षा अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीर: निकालापूर्वी दहशतवाद्यांचा कट हाणून पाडला, शस्त्रे-स्फोटके जप्त!
महाराष्ट्रातील विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा
चेंबूरमध्ये भीषण आगीत सात जणांचा मृत्यू
इस्रायलचा गाझामधील मशिदीवर हवाई हल्ला, १८ ठार!
एस. के. स्टोन, सेंट्रल मैदान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसांचा हा कार्यक्रम होता. यासंदर्भातील पत्रकेही काढण्यात आली होती. त्यात कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आले आहे. बजरंग दलाचे रूपेश दुबे यासंदर्भात म्हणाले की, आमचे हे दुर्भाग्य आहे की, शिवाजी महाराजांच्या भूमीत असे धर्मांतरणाचे काम चालते. सामान्य प्रार्थना करण्याच्या नावाखाली हे सक्तीने धर्मांतरण इथे करण्याचा प्रयत्न सुरू होता. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे समजले तेव्हा इथे सुरक्षा कडेकोट होती. पोलिसांनाही आत जायला बंदी होती. जर प्रार्थना असेल तर तिथे बाथ टब ठेवण्याची काय आवश्यकता होती? त्यामुळे पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला.
दुबे यांनी म्हटले की, डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात सहकार्य केले आहे. पोलिसांनी कार्यक्रम थांबवून ४१ जणांना पोलिस ठाण्यात नेले. त्यात वाडातून २५ आदिवासींनाही आणण्यात आले होते. सदर आयोजकांवर एफआयआर व्हावे, अशी मागणीही बजरंग दलाने केली आहे.