गुरुवारपासून ओडिशातील श्री जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे पुन्हा उघडणार आहेत. तसेच, मंदिराच्या सद्य स्थितीतील सर्व आवश्यक गरजांसाठी कॉर्पस फंड स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. ओडिशाच्या नव्या भाजप सरकारने आपल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर केला आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी राज्य सचिवालय लोक सेवा भवनात आपल्या मंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्यानंतर ही माहिती बुधवारी देण्यात आली.
मंदिराचे दरवाजे उघडण्याचे निवडणुकीतील आश्वासन
‘राज्य सरकारने सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत जगन्नाथ पुरीची सर्व चार द्वारे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भक्तांना चारही दरवाजांमधून मंदिरात पोहोचता येईल,’ अशी माहिती माझी यांनी बैठकीनंतर दिली. सर्व मंदिरांची द्वारे उघडण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. मंदिराची द्वारे बंद असल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
करोनाकाळापासून होती मंदिराची दारे बंद
गेल्या बिजू जनता दल सरकारने करोना साथीनंतरच मंदिरातील चारही दरवाजे बंद केले होते. त्यामुळे भाविक एकाच दारामधून प्रवेश करू शकत होते. त्यामुळे सर्व दरवाजे उघडण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून भक्त करत होते.
मंदिराच्या देखभालीसाठी ५०० कोटींचा कॉर्पस फंड
मंदिराची सुरक्षा आणि देखभाल-दुरुस्तीसाठी मंत्रिमंडळाने ५०० कोटी रुपयांचा कोष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माझी यांनी दिली. सर्व मंत्री बुधारी रात्री तीर्थनगरी पुरीमध्येच थांबले होते आणि चारही दरवाजे उघडण्यावेळी ते सर्व जण मंदिरातच उपस्थित राहतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
हे ही वाचा:
रियासी दहशतवादी हल्ल्याचा पाक क्रिकेटपटूकडून निषेध
अमेरिकेला पराभूत करून भारताची सुपर आठमध्ये धडक
हिंदू यात्रेकरूंवरील हल्लाप्रकरणी विहिंप, बजरंग दल आक्रमक!
इटलीत खलिस्तानी समर्थकांकडून महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना!
धान्याची किमान आधारभूत किंमत ३१०० रुपये
राज्य सरकारकडून धान्याची किमान आधारभूत किंमत वाढवून ३१०० रुपये प्रति क्लिंटल दर केली जाणार आहे आणि सर्व संबंधित विभागाला त्यातून तोडगा काढण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ‘समृद्ध कृषक नीती योजना’ हे विशेष धोरण तयार केले जाणार आहे.