23 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरधर्म संस्कृतीआलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले (भाग १)

आलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले (भाग १)

'आलमगीर गाझी महंमद मोहिउद्दिन औरंगजेब' हा मराठ्यांच्या इतिहासातला एक अटळ भाग आहे. मराठ्यांच्या तीन पिढ्या ज्याच्याशी झुंजण्यात गेल्या; मराठ्यांचे तीन छत्रपती ज्याने पाहिले असा दीर्घायुषी बादशहा औरंगजेब! मुघल साम्राज्याला कळसापर्यंत नेण्याचं काम औरंगजेबाने केलं; मात्र त्याच्याच हयातीत हे साम्राज्य उताराला देखील लागलं. त्याचं दीर्घायुष्य ज्या मुघलांसाठी वरदान होतं तेच पुढे शाप ठरलं. दक्षिणेमध्ये उतरताना मराठ्यांचे साम्राज्य बुडवण्याचा हेतूने उतरलेला औरंगजेब स्वतः अहमदनगर जवळ भिंगार येथे मृत्यू पावला. मराठ्यांशी लढण्याकरिता दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतूबशाही या कित्येक शतके चालत आलेल्या बादशहा देखील संपवल्या मात्र मराठ्यांच्या मुलुखाला धक्का लावणं त्याला काही जमलं नाही. शेवटी अहमदनगर जवळील भिंगार येथे त्याचा मृत्यू झाला. मराठ्यांनी कोणाशी नेमकी झुंज घेतली? तो शत्रू कसा होता? काय होता? त्याचं राजकारण कसं आहे? त्याचं सेना किती होती? या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व अधिकच स्पष्ट होतं. त्यासाठी औरंगजेबाच्या एकंदरीत आयुष्याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा आहे.

Google News Follow

Related

२० फेब्रुवारी १७०७, शुक्रवार, अहमदनगर जवळील भिंगार येथे आपल्या छावणीत अर्धवट ग्लानीत असलेल्या ८९ वर्षांच्या औरंगजेबाची बोटे हातातील जपमाळेवर फिरत होती – “ला इलाह इल्लल्लाह” … “अल्लाह वाचून दुसरे दैवत नाही!” पहिला प्रहर उलटून गेल्यावर कधीतरी त्याचा अडखळणारा श्वास थांबला. स्वतःला “आलमगीर” म्हणवून घेणारा तो दख्खनच्या दोन हात जागेत कायमचा विसावला. मराठ्यांना जिंकून घ्यायची त्याची इच्छा अपूर्णच राहिली. शुक्रवार हा विश्रांतीचा दिवस असतो आपल्याला त्या दिवशी मरण यावे इतकी काय ती एक इच्छा पूर्ण झाली. सत्तेसाठी आपल्या बापाला कैदेत घालणारा आणि भावांना, पुतण्यांना, मुलाला मृत्युमुखी ढकलणारा औरंगजेब नेमका होता तरी कसा? सतराव्या शतकात औरंगजेबामुळे मुघलांनी साम्राज्य विस्तार या दृष्टिने भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्याला अनुभवलं होतं पण ते साम्राज्य खरोखर तितकं बलशाली होतं का? हा सगळा काळ एका लेखाच्या चिमटीत पकडणे शक्य नाही. तरी औरंगजेबाचे व्यक्तिमत्व उलगडण्याचा हा प्रयत्न आहे.

शहाजहान आणि लहानगा औरंगजेब. मुघल शैलीतील तैलचित्र (साभार- ब्रिटिश म्युझियम, संकेत कुलकर्णी)

औरंगजेब हा मराठ्यांच्या इतिहासातील एक अटळ बिंदू आहे. क्रूर, कपटी, थंड डोक्याचा आणि त्याहूनही थंड काळजाचा, निडर, धर्मांध, हट्टी, पाताळयंत्री, खुनशी, धूर्त, कावेबाज, विश्वासघातकी तरीही मानगुटिवर बसणारा. मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी म्हणून औरंगजेबाचे चरीत्र वाचले जाणे क्रमप्राप्त असते. जसजसे औरंगजेब वाचत जातो तसतसा तो एखाद्या भूतासारखा मानगुटीवर बसतो. श्री नरहर कुरुंदकरांनी “श्रीमान योगीच्या” प्रस्तावनेत जे म्हंटलंय ते खरं आहे – “आलमगीर म्हणजे धर्मवेडा पिसाट पुरुष नाही. तो पुरेसा क्रूर होता, पण तसाच युद्धतज्ञ, राज्यकारभारप्रवीण, धूर्त व संथ होता. कर्तबगार, चाणाक्ष आणि व्यवहारवादी होता. औरंगजेब जे करत होता, ते पिसाट धर्मवेड नव्हते. ज्या जेत्यांचा तो प्रतिनिधी होता, त्यांचे वर्चस्व टिकविण्यासाठीचा तो निर्णायक लढा होता. अश्या निर्णायक लढ्यात तडजोड शक्य नसते. औरंगजेबाचा पराभव हा त्याचा पराभव नव्हता. गझनीपासून त्याच्यापर्यंतच्या इस्लाम विजयाचा तो शेवट होता. हा औरंगजेब आपण कधी समजून घेत नाही. म्हणून शिवाजी आपल्याला समजत नाही.”

औरंगजेबाची कारकिर्द त्याच्या पूर्वजांच्या कारकिर्दिवर तपासून बघायला हवी. खास करुन अकबर आणि त्याचा भाऊ दारा शुकोह ह्यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. आधीच्या रानटी – राक्षसी आणि धर्मांध मुस्लिम आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर दगडापेक्षा वीट मऊ ह्या तत्वावरती अकबर हा हिंदूंना मिळालेली एक संधी होती असं म्हणावं लागेल. अकबराची स्वार्थासाठी का होईना पण सर्वांना बरोबर घेऊन जायची वृत्ती अकबराला निश्चित वेगळे ठरवते. अकबर हा कट्टर मुल्ला-मौलविंसाठी “दु:स्वप्न” होता असं म्हंटलं तरी वावगं ठरु नये. अकबराने इस्लामविरुद्ध जितक्या कृती केल्या तितक्या निदान एकोणिसाव्या शतकापर्यंत जगाच्या पाठीवरती दुसर्‍या कुठल्याही मुस्लिम शासनकर्त्याने केल्या नसाव्यात. शिवाय अकबराने सत्ता टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंशी जुळवून घेण्यास सुरुवात केली. राजपूत राजकन्यांशी विवाह केले. आपल्या दरबारात हिंदूंना मोठी पदे दिली. त्याला मुल्ला-मौलवींचा प्रखर विरोध झाला तो त्याने निष्ठुरपणे मोडून काढला. हिंदूंशिवाय शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध वगैरे धर्मांबाबत त्याने रस दाखवला व सरतेशेवटी त्याला स्वतःला प्रेषित व्हायची हुक्की आली व ‘दिन-ए-इलाही’ नामक धर्माची स्थापना करून भागवली. तो किडूकमिडूक धर्म त्याच्यासोबत संपला.

अकबरानंतर सत्तेवरती आलेला त्याचा मुलगा सलीम याने देखिल अकबराच्या धार्मिक प्रथेत फार बदल केले नाहीत. नाही म्हणायला एकदा गयेच्या बोधीवृक्षावरती कुर्‍हाड चालवून मग त्यावर तापून लाल झालेला तवा ठोकला होता. पण तरी तो आधीच्या रानटी आक्रमकांइतका धर्मपिसाट नव्हता. खुर्रम उर्फ शहांजहान तर सर्व मुघलांमधील मोठा रसिक माणूस निघाला. उत्तमोत्तम इमारती – स्थापत्य वगैरे दृष्टीने मुघलांचा तो सुवर्णकाळच ठरला. आपल्यानंतर आपल्या गादिवरती आपला थोरला मुलगा दारा शुकोह यावा अशी इच्छा त्याने जाहीर केली होती. दारा शुकोहला त्याने मुद्दाम दिल्लीत आपल्या जवळ ठेवून घेतले होते. दाराकडे पंजाबचा संपन्न प्रांत दिला होता. पंजाबचे काम दारा आपल्या मुतालिकांकरवी करत असे. दिल्लीत तो बहुतेक काळ सर्व धर्मांतील धर्ममार्तंडांशी चर्चा करण्यात घालवत असे. त्याने उपनिषिदांचे फारसीत भाषांतर करुन घेतले होते व त्याला नाव दिले होते – “अल्लोपनिषिद”. या प्रकारांमुळे मुल्ला-मौलवींचा रोष त्याने ओढावुन घेतला होता ह्यात वाद नाही. शहाजहानची इतर दोन मुले शुजा आणि मुराद. शुजा हुशार आणि पराक्रमी होता पण सावध नव्हता. शुजा सतरा वर्षे बंगालचा सुभा सांभाळत होता. तर मुराद हा शहाजहानचा सर्वात धाकटा, चौथा मुलगा गुजरातच्या सुभ्यावरती होता. सतत दारुत बुडलेला असे. एकदा काबूल सुभ्यावरती त्याने अल्पकाळ पराक्रम करुनही दाखवला पण अफगाणिस्थान मधली कडाक्याची थंडी जीवघेणी ठरणार हे ओळखून शहाजहानचा रोष पत्करुन तो उलटा फिरला होता. त्यामुळे शहाजहानला दारा वगळता बाकिच्या तीन मुलांनी आपल्या गादिवर बसावे असे वाटत नव्हते.

शहजहानचा तिसरा मुलगा महंमद मुइउद्दीन औरंगजेब हा तिघांहुनही वेगळा होता. संथ, थंड, इस्लामचा कट्टर पुरस्कर्ता. २४ ऑक्टोबर १६१८ हा त्याचा जन्म दिवस. गुजरात मधल्या दाहोद येथे जन्माला आला. पुढे १६२५ मध्ये शहाजहानने आपल्या बापाविरुद्ध म्हणजे जहांगीरविरुद्ध बंड केले तेव्हा त्याला वेसण घालण्यासाठी जहांगिरने आपले दोन नातवांना – दाराला आणि सात वर्षांच्या औरंगजेबाला आपल्या ताब्यात घेतले व ओलिस ठेवले. जहांगीर १६२७ मध्ये मरण पावला तेव्हा त्याची दोन मुले खुश्रु आणि खुर्रम यांच्यात लढाई झाली. खुर्रम जिंकला. त्याने आपल्या भावाचे डोळे फोडले व त्याला कैदेत घातले. स्वत: शहाजहान असे नामाभिधान घेऊन गादिवर बसला. नऊ वर्षांचा औरंगजेब आपल्या बापाचे हे प्रकार अनुभवत होता. औरंगजेबाचे धार्मिक व राजकिय शिक्षण ह्याच काळात झाले. अरेबिक, फार्सी आणि हिंदुस्थानी तो उत्तम बोलत असे. शस्त्रास्त्रात त्याने बरीच प्रगती केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच्यातील चिवट आणि निडर स्वभाव सर्वांना दिसला. झाले असे कि शहाजहानच्या आदेशावरून आग्रा किल्याच्या समोर यमुनेच्या वाळवंटात सुधाकर आणि सुरतसुंदर या २ हत्तींची झुंज लावली गेली. झुंजीत सुरतसुंदरने माघार घेतली व तो दूर पळून गेला.  जिंकलेल्या सुधाकरला मद चढल्याने त्याने त्याचा मोर्चा जवळच उभ्या असलेल्या औरंगजेबाकडे वळवला औरंगजेबाने मांडीखालील घोड्याला अजिबात हलू न देता हातातील भाला हत्तीकडे फेकला त्यामुळे हत्तीला राग येऊन त्याने घोड्यावर हल्ला चढविला. घोड्यावरून खाली पडलेला औरंगजेब पुन्हा त्वेषाने तलवार उपसून उभा राहिला. तोवर त्याचा मोठा भाऊ शुजा आणि जयसिंग तसेच आजूबाजूचे सैनिक देखील जवळ पोहोचले व त्यांनी हत्तीचे लक्ष विचलित केले. तोवर पळून गेलेला सुरतसुंदर देखील पुन्हा मैदानात आला आणि सुधाकर पुन्हा मागे फिरला.

वयाच्या सतराव्या वर्षीच त्याला सप्त हजारी मनसब मिळाली. डिसेंबर १६३४ मध्ये त्याला दहा हजारांची मनसब देऊन लगेच १६३५ मध्ये त्याची नेमणूक बुंदेल्यांवर करण्यात आली. तिथे झुजहारसिंगचे बंड मोडायची कामगिरी त्याने पार पाडली. तो स्वत: लढला नसला तरी युद्धाचे आदेश औरंगजेबाचे होते. झुजहारसिंग मारला गेल्यावर त्याचे दोन मुलगे आणि एक नातू यांना बाटविण्यात आले. ओर्च्छा येथील वीरसिंगाचे मंदिर जमीनदोस्त करून तिथे मशीद उभारली गेली. यावर खुश होऊन त्याला दख्खनची सुभेदारी देण्यात आली. १७३६ ते १७४४ अशी तब्बल आठ वर्षे त्याने दख्खनची सुभेदारी सांभाळली. यात साल्हेर-मुल्हेर सारख्या बेलाग किल्ल्यांसहित बागलाण प्रदेश आपल्या ताब्यात आणला. तेथील गोंड राजांनाही बाटवले. याच काळात मुर्तजा निजामाच्या आडून चालवलेल्या शहाजीराजांच्या मोहिमेला मुघलांनी दडपून टाकले. तर १७३९ मध्ये शहाजीराजांचा चुलतभाऊ खेळोजीराजे हे विजापूरकरांची नोकरी सोडून दौलताबाद भागात लुटालूट करू लागल्याची खबर आली. त्यांना पकडून औरंगजेबाने ठार मारण्याचा हुकूम दिला.

औरंगजेबाची एकूण चार लग्ने झाली. दिलरसबानू ही पर्शियन राजघराण्यातील होती तर नबाबबाई ही रजपुत वंशाच्या मुस्लिम संस्थानिकाची मुलगी होती असं काही जण म्हणतात तर काहींच्या मते तिला नंतर मुस्लिम धर्माची दिक्षा दिली होती. तिसरी औरंगाबादी बेगम. उदेपुरचे राजपुत कधीच मुघलांसमोर झुकले नाहीत. आपल्या घरातली मुलगी त्यांनी मुघली जनान्यात दिली नाही. म्हणून किमान मानसिक सूडाचे समाधान मिळविण्यासाठी त्याने चौथ्या पत्नीचे नाव नाव उदेपुरी ठेवले म्हणे. ही उदेपुरी महल आधी दाराची दासी होती. याशिवाय  दख्खन सुभ्यावरती असतानाच औरंगजेब “हिराबाई” उर्फ “जैनाबादी महल” हिच्या प्रेमात पडला. ती त्याच्या मावशीच्या नवर्‍याच्या म्हणजे मीर खलील उर्फ खान-इ-जमान याच्या जनानखान्यातील एक दासी होती. औरंगजेबाच्या रुक्ष आयुष्यातली हीच एक काय ती हिरवळ. हिराबाई मुळची ख्रिश्चन होती म्हणे, नंतर ती मुसलमान झाली. हिराबाई वर्षभरातच वारली आणि हे प्रकरण संपलं.

हा काळ खऱ्या अर्थाने दारा आणि औरंगजेब यांच्यातील तणाव वाढविणारा होता. दोघांनाही आता सत्ता खुणावू लागली होती. दारा आणि जहानआरा हे दोघेही कायम शहाजहानच्या सोबत वावरत असत. त्यामुळे दारा कायम शहाजहानच्या नजरेसमोर असे. इतर दोन भावांपेक्षा औरंगजेब हा आपला खरा प्रतिस्पर्धी आह हे दाराने देखील ओळखले असावे. तो देखील औरंगजेबाच्या कामात अप्रत्यक्ष ढवळाढवळ करीत असे. या किंवा अश्याच एखाद्या कारणामुळे एके दिवशी औरंगजेब दख्खनमधून उठून थेट आग्र्याला निघून आला आणि सगळ्याचा त्याग करून फकीर होण्याचा हट्ट धरून बसला. कुठलेही प्रशासकीय किंवा अत्यावश्यक कारण न देता आपला सुभा सोडून येणे हा सरळसरळ शहाजहानच्या आज्ञेचा भंग होता. यामुळे शहाजहान संतापला व त्याने खरोखर औरंगजेबाचे सगळे अधिकार काढून घेतले. त्याला दरबारात येण्यासही बंदी घातली. दुसरा एक प्रवाद असाही आहे कि औरंगजेबच्या या आग्रा भेटीत दाराने बांधलेला महाल बघण्यासाठी त्याने शहाजहान व औरंगजेबाला आमंत्रित केले. मात्र औरंगजेब इतका संशयी होता कि खोलीला एकच दरवाजा आहे व दारा आपल्याला बंदी बनवू शकतो अश्या कल्पनेने तो आत न जाता दरवाजाजवळ थांबला. शाहजहानाने स्वतः आत बोलावूनही तो आत न आल्याने शहाजहान चिडला होता. अखेर जहानआरा मध्ये पडली व तिने आपल्या या मोठ्या भावाची रदबदली केली. जहानआरा शहाजहानची अत्यंत लाडकी मुलगी होती आणि नुकतीच एका अपघातातून सावरली होती ज्यात तिच्या कपड्यांनी पेट घेतला होता व त्या जखमांतून बरे होण्यासाठी तिला तब्बल पाच महिने लागले होते. तिच्या शब्दाखातर दोघांनी आपापले अहं बाजूला ठेवले व प्रकरण निवळत गेले. फेब्रुवारी १६४५ मध्ये औरंगजेबाला गुजरातची सुभेदारी मिळाली.

क्रमशः

– सौरभ वैशंपायन

spot_img

लेखकाकडून अधिक

6 कमेंट

  1. जय श्रीकृष्
    अप्रतिम
    अभिनंदन असेच अभ्यासपूर्ण आपणाकडून वाचावयास मीलो
    आभार
    राजू गांधी पुणे
    9822052586

  2. माहितीपूर्ण. ‘शत्रूच्या सामर्थ्याची खरी ओळख झाल्यानंतरच आपल्या महापुरुषांची पुरी ओळख पटते’- हा दृष्टिकोन आवडला. पुढील लेखाच्या प्रतीक्षेत आहोत..
    शुभेच्छा!

  3. खुसरोचे डोळे शाहजहानने फोडले, असं तुम्ही लिहिलंय, पण इतिहासात असं वाचलंय की, ‘जहांगीराविरुद्ध खुसरोने केलेलं बंड मोडल्यावर, जहांगीरानेच त्याचे डोळे फोडले होते’. कृपया यापैकी काय बरोबर आहे, ते सांगू शकाल का?

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा