२२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याने बुधवारी दिली.
रामजन्मभूमी चळवळीचे अर्ध्वयू लालकृष्ण अडवाणी सध्या ९६ वर्षांचे आहेत. मात्र ते या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विश्व हिंदू परिषदेने लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना डिसेंबरमध्येच अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. मात्र या दोघांची प्रकृती ठीक नसल्याने ते या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, असे मंदिर ट्रस्टतर्फे सांगण्यात आले होते.
हे ही वाचा:
जय श्रीराम : सोहळ्यातील ११ हजार व्हीआयपींना देणार स्मृतिचिन्ह!
ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या पाच दिवसांनंतरही शाहजहां यांचा ठावठिकाणा नाही!
१२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील प्रकल्पांचे उदघाटन!
मात्र आता अडवाणी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा तसेच, वैद्यकीय सोयी तैनात करण्यात येणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले.
२२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही ठराविक जणांनाच निमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंतांना बोलावण्यात येत असून अयोध्येतील राम मंदिर घडवणाऱ्या कारागिरांच्या कुटुंबांनाही खास निमंत्रित केले जाणार आहे. उद्घाटन सोहळा १६ जानेवारीपासूनच सुरू होणार असून सोहळ्याची संपूर्ण तयारी १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे.