डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका नाटकात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची चेष्टा उडविण्याचा प्रकार घडल्यानंतर ते नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले.
या विद्यापीठात युवक महोत्सवाच्या निमित्ताने हे नाटक सादर करण्यात आले होते. त्यात श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईवर एक विडंबन सादर करण्यात आले. त्यामुळे ते नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांनी आक्षेप घेतला. या घटनेमुळे वातावरण तापले. त्या नाटकाचा अंश आता व्हीडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हीडिओत रंगमंचावर श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेची भूमिका करणारी पात्रे यांच्यात संवाद सुरू आहे. श्रीरामाच्या शोधात लक्ष्मण निघून जाताना लक्ष्मण रेषा आखून सीतेला सावधगिरी बाळगण्यास सांगतो. त्यानंतर सीतेच्या व्यक्तिरेखेतील मुलगी लावणीवर नाच करताना दाखविली आहे. त्यावर उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरून आरडाओरडा झाला आणि उपस्थितांनी नाटक बंद पाडले. त्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्तेही होते. हिंदू देवीदेवतांची थट्टा उडवत असल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. यावर आता विद्यापीठ प्रशासन काय कारवाई करणार याची आता प्रतीक्षा आहे. हे नाटक बसवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी केली जात आहे.
मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर मधला हा प्रकार आहे. नाटक करणाऱ्यांच्या तोंडात कोणताही संवाद देऊन देवांचा अपमान केला जात आहे. Abvp ने वेळीच गोंधळ घालून नाटक बंद पाडले. मात्र हे नाटक घेण्यामागे कोणती हिंदू धर्मविरोधी शक्ती कार्यरत आहे याची चौकशी व्हावी त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे pic.twitter.com/Fw4KJTw06B
— दिपक राठोड (@the_dipakrathod) October 18, 2022
डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हा युवक महोत्सव १६ ऑक्टोबरला सुरू झाला. वेगवेगळे कलाप्रकार या महोत्सवात सादर करण्यात येणार आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या १३६ महाविद्यालयातील १६५० विद्यार्थी त्यात सहभागी होणार आहेत. मात्र या घटनेनंतर युवक महोत्सवावर वादाचे सावट आहे.
एका ठराविक धर्माच्या देवीदेवतांवर सातत्याने अशाप्रकारची टीका करण्याचा प्रयत्न अनेकवेळा होत असतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर आपण काहीही करू शकतो, अशा समजातून अशा प्रकारची नाटके, कलाकृती सादर होत असतात.