उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये सापडले ४४ वर्षांपासून बंद असलेले शिव मंदिर!

गर्भगृहाच्या उत्खननात सापडल्या हनुमान, शिवलिंग, गणपतीची मूर्ती

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये सापडले ४४ वर्षांपासून बंद असलेले शिव मंदिर!

उत्तर प्रदेशच्या संभल, वाराणसी, बुलंदशहरनंतर आता मुरादाबादमध्ये एक जुने मंदिर सापडले आहे. हे गौरी शंकर मंदिर ४४ वर्षांपासून बंद होते. महापालिकेच्या पथकाने गर्भगृहाचे उत्खनन केले तेव्हा शिवलिंग आणि काही खंडित मूर्ती ढिगाऱ्याखाली असल्याचे लक्षात आले. यानंतर या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. आता मंदिराची स्वच्छता केल्यानंतर मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

मुरादाबादमध्ये ४४ वर्षांपासून बंद असलेल्या गौरी शंकर मंदिरात उत्खनन करताना नंदी, गणेश, कार्तिकेय आणि भगवान हनुमानाच्या खंडित मूर्ती सापडल्या. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मंदिराची स्वच्छता करून घेतली. अद्याप मंदिर कोणाच्या मालकीचे आहे हे स्पष्ट झालेले नाही. हे मंदिर अनेक वर्षे बंद असल्यामुळे देखभालीअभावी मंदिराची अवस्था बिकट झाली आहे. मात्र, आता मूर्ती सापडल्याने मंदिराची डागडुजी केली जात आहे. पूजा करता यावी यासाठी मंदिराची साफसफाई करून रंगरंगोटी केली जात आहे.

या स्थळाच्या पाहणीदरम्यान, मंदिराचे दोन्ही दरवाजे १९८० साली दगडी बांधकामाने बंद केल्याचे पथकाला आढळून आले. १९८० च्या दंगलीत पुजाऱ्याची हत्या झाल्यापासून मंदिर बंद असल्याची माहिती आहे. तर, पुजाऱ्याच्या नातवाने आठवडाभरापूर्वी मुरादाबादच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना अर्ज देऊन मंदिर पुन्हा उघडण्याची विनंती केली होती. यानंतर तीन दिवसांपूर्वी प्रशासनाने शहरातील नागफणी भागातील झब्बू का नाला परिसरात असलेल्या मंदिराचा आढावा घेतला आणि सोमवारी कडेकोट बंदोबस्तात साफसफाई आणि खोदकाम केले. उत्खननादरम्यान हनुमान, शिवलिंग आणि नंदीच्या मूर्ती सापडल्या असून मंदिर पूर्ण स्वरुपात येईपर्यंत ही प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे.

जिल्हा दंडाधिकारी राम मोहन मीना यांनी सांगितले की, हे मंदिर १९८० च्या दंगलीपासून बंद होते. सोमवारी महापालिकेचे पथक आणि पोलिस दलाच्या पथकासह घटनास्थळी आल्यानंतर मंदिराचा गेट उघडण्यात आला तर, गर्भगृह रिकामे करण्यात आले. मंदिरात जुन्या मूर्ती, शिवलिंग आणि काही खंडित मूर्ती सापडल्या आहेत. संपूर्ण मंदिर पुन्हा मूळ स्वरूपात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. साफसफाई झाली की, मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल.

हे ही वाचा : 

… म्हणून प्रियांका वाड्रा यांनी गृहमंत्री शाहांचे मानले आभार

गाझियाबादमध्ये चमत्कार! वीज पडलेल्या शेतातील खड्ड्यात सापडले ‘शिवलिंग’

धक्कादायक! मालेगावात १,००० रोहिंग्या, बांगलादेशींना दिले जन्म दाखले!

देशभरात शोककळा अन राहुल गांधींचा नववर्ष साजरा करण्यासाठी परदेश दौरा!

यापूर्वी संभल येथील मुस्लीमबहुल परिसरात ४६ वर्षांपासून बंद असलेले शिवमंदिर सापडले. वीजचोरीचा तपास करणाऱ्या पथकाला याची माहिती मिळाली. याचे उत्खनन केल्यानंतर तेथे पूजा- आरती सुरू करण्यात आली आहे. याशिवाय आणखी काही मुस्लिमबहुल भाग असलेल्या ठिकाणी मंदिरे सापडली आहेत.

Exit mobile version