रामलल्लाच्या दरबारात महिन्याभरात ६२ लाख भाविकांची हजेरी

धार्मिक पर्यटकांमुळे शहराच्या अर्थव्यवस्थेलाही चालना

रामलल्लाच्या दरबारात महिन्याभरात ६२ लाख भाविकांची हजेरी

उत्तर प्रदेशातील अयोध्येत महिन्याभरापूर्वी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडला होता. नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाला विराजमान होऊन आता एक महिना उलटला आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सामान्य भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले होते. देशभरातील रामभक्तांनी प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत धाव घेतली होती.

मंदिर खुले होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला असून या एका महिन्यात विक्रमी संख्येने रामभक्तांनी प्रभूंचे दर्शन घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचा अभिषेक केल्यानंतर हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. दररोज २ ते ३ लाख भाविक अयोध्येत येत असून राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

महिन्याभरात सुमारे ६२ लाख भाविकांनी रामलल्लाच्या दरबारात हजेरी लावली आहे. देशभरातून दररोज १० ते १५ हजार भाविक आस्था विशेष ट्रेनने अयोध्येला पोहचत आहेत. याशिवाय इतर वाहतुकीच्या मार्गांनी आणि खासगी वाहनांनीही अयोध्या गाठणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

या एका महिन्यात देश-विदेशातील अनेक व्हीव्हीआयपी लोकांनीही रामललाचे दर्शन घेतले आहे. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशचे आमदार, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ, चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, अमेरिका, फिजी., कंबोडियाचे प्रतिनिधी, श्रीलंका, नेपाळचे माजी राजा आदी दिग्गजांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी पुन्हा ठरले जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेते

नाइटक्लबने प्रवेश न दिल्याने भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा गारठून मृत्यू

शरद पवार यांच्या गटाला ‘तुतारीवाला माणसा’चे चिन्ह

मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक झाल्यानंतर भाविकांची संख्या अधिक वाढल्याने स्थानिक व्यावसायिकांना याचा मोठा फायदा झाला आहे. शहरातून कामगारांचे स्थलांतरही थांबले आहे. याशिवाय शहरातील सर्वच विकासकामांना गती मिळाली आहे. रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि रस्ते व्यवस्था सुधारण्यात आली आहे. जगभरातून येणाऱ्या धार्मिक पर्यटकांमुळे शहराच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे.

Exit mobile version