अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक विधीला सुरुवात झाली आहे. याच क्रमाने आज भगवान रामलल्ला आपल्या मंदिरात प्रवेश करणार आहेत. प्रभू रामांची मूर्ती प्रथम रामजन्मभूमी संकुलात नेण्यात येणार आहे. त्यानंतर गर्भगृहाची शुद्धी होईल आणि त्यानंतर उद्या म्हणजेच गुरुवारी रामलल्ला गर्भगृहात प्रवेश करतील. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. रामजन्मभूमीत तीन मूर्ती बसवण्याची तयारी असली तरी उर्वरित दोन मूर्तींचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे स्पष्टीकरण श्री रामजन्मभूमी तीरथ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले आहे.
चंपत राय यांनी सांगितले की, उर्वरित प्रभू रामांच्या दोन्ही मूर्ती मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवल्या जाणार आहेत.ते पुढे म्हणाले की, राम मंदिराचा पहिला मजला तयार होताच उर्वरित दोन मूर्तींपैकी एक मूर्ती वैदिक विधींसह स्थापित करण्यात येईल.त्यानंतर डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित मूर्ती दुसऱ्या आणि शेवटच्या मजल्यावर बसवण्यात येणार आहे.श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून हे सर्व काम केले जाईल असे चंपत राय यांनी सांगितले.
हे ही वाचा:
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येत २० हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती होणार
मणिपूर: सुरक्षा दल आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये चकमक, जवान हुतात्मा!
इराणची पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई; दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त
शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरासाठी तीन मूर्तिकारांनी प्रभू रामांच्या तीन वेगवेगळ्या मूर्ती तयार केल्या होत्या.
या तीन मूर्तींपैकी मंदिर ट्रस्टकडून कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी काळ्या पाषाणात तयार केलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली. प्रभू रामांची ही मूर्ती २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापन करण्यात येणार आहे.तसेच इतर दोन मूर्तींपैकी एक कर्नाटकातील गणेश भट्ट यांनी काळ्या दगडात कोरलेली आहे आणि दुसरी राजस्थानमधील सत्य नारायण पांडे यांनी पांढऱ्या मकराना संगमरवरी दगडात कोरलेली आहे.
प्रभू रामांच्या या तीनही मूर्ती मुंबईतील प्रसिद्ध कलाकार वासुदेव कामथ यांच्या रेखाटनांवर आधारित आहेत.
त्यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला राम लल्लाचे पेन्सिल स्केचेस सादर केले होते. कर्नाटकातील करकला गावात जन्मलेले कामथ मुंबईत लहानाचे मोठे झाले. कामथ हे पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित चित्रांसाठी ओळखले जातात. त्यांच्या रामायण मालिकेतील २८ चित्रे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत.