महिनाभरात रामलल्लाच्या चरणी २५ किलो सोने, चांदीचे दागिने अर्पण

रामनवमीच्या दिवशी मोठ्या संख्येने रोख रक्कम देणगीरूपात जमा होऊ शकते

महिनाभरात रामलल्लाच्या चरणी २५ किलो सोने, चांदीचे दागिने अर्पण

नव्यान साकारलेल्या राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर एक महिन्यात रामलल्लाच्या चरणी २५ किलो सोने-चांदीच्या दागिन्यांसह २५ कोटी रुपयांची देणगी अर्पण झाली आहे. या २५ कोटी रुपयांमध्ये चेक, ड्राफ्ट आणि मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात जमा झालेल्या रोकडसह दानपेट्यांमध्ये जमा पैशांचाही समावेश आहे. अर्थात, यात मंदिर ट्रस्टला ऑनलाइन माध्यमातून मिळणाऱ्या पैशांचा समावेश नाही, असे राम मंदिर ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले.

‘रामलल्लासाठी अनेक भाविक सोन्या-चांदीच्या वस्तू, दागिने बनवून ते अर्पण करत आहेत. मात्र त्यांचा उपयोग राम मंदिरासाठी केला जाऊ शकत नाही. मात्र तरीही भक्तांच्या भक्तिभावाचा आदर करून या वस्तू, दागिने, भांडी स्वीकारली जात आहेत,’ असे गुप्ता यांनी सांगितले. रामनवमी उत्सवाच्या दरम्यान या देणग्यांमध्ये आणखी वाढ होईल, असा ट्रस्टचा अंदाज आहे. या वेळी सुमारे ५० लाख भाविक अयोध्येला येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

अशोक चव्हाण कामाला लागले; तब्बल ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश!

राष्ट्रध्वजाला म्हटले ‘सैतानी’; फ्रान्सने केले मुस्लिम धर्मगुरूला हद्दपार

‘आज कोणीही मनमानीपणे आपल्या इच्छेविरोधात व्हिटो करू शकत नाही’!

भाजपची तमिळनाडूमध्ये कमाल कामगिरी!

रामनवमीच्या दिवशी मोठ्या संख्येने रोख रक्कम देणगीरूपात जमा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने रामजन्मभूमीवर चार स्वयंचलित नोटांची गणना करणारी यंत्रे बसवली आहेत. ट्रस्टकडून एक डझनहून अधिक कम्प्युटरचे काऊंटर उभारण्यात आले आहेत, जेणेकरून देणग्या देणाऱ्यांना जलदगतीने पावत्या दिल्या जातील. तसेच, मंदिर परिसरातील दानपेट्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

रामलल्लाला मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने, वस्तू यांचे मूल्यांकन करण्यासाठी ते वितळवण्याची आणि पुढील जबाबदारी भारत सरकारच्या टाकसाळीकडे सोपवण्यात आल्याचे मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी सांगितले. तर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी दान, चेक, ड्राफ्ट आणि रोकड एकत्र करून ते बँकेत जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतील.

Exit mobile version