एका तासात १८०० भाविकांना मिळणार केदारनाथाचे दर्शन

मंदिर समिती सज्ज

एका तासात १८०० भाविकांना मिळणार केदारनाथाचे दर्शन

केदारनाथ यात्रेत जूनमध्ये पुन्हा भक्तांचा महापूर लोटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने पूर्ण तयारी केली आहे. भाविकांच्या गर्दीचा विचार करता, मंदिर समितीने एक तासात १८००हून अधिक भाविकांना दर्शन मिळावे, अशी योजना आखली आहे. तसेच, बाबा केदारनाथाचे दर्शन भाविक रात्री १२ पर्यंत करू शकतील.

१० मे रोजी सुरू झालेल्या केदारनाथ यात्रेत २२ दिवसांत विक्रमी पाच लाख ८८ हजार ७९० भाविकांनी दर्शन घेतले आहे. सन २०२२मध्ये २३१ दिवसांत पाच लाख ५४ हजार ६७१ भाविकांनी दर्शन घेतले होते. शाळांना असणाऱ्या सुट्ट्या आणि ऑफलाइन नोंदणी सुरू झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात केदारनाथमध्ये भाविकांची गर्दी आणखी वाढेल, असा अंदाज आहे.

केदारनाथ मंदिर समितीने भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी एक योजना आखली आहे. त्यानुसार, समिती एका दिवसात ३६ हजार भाविकांना दर्शन देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. भाविकांच्या गर्दीनुसार एका तासात १८०० ते २१०० भाविकांना दर्शन दिले जाईल. जूनमध्ये धर्म दर्शन पहाटे साडेचार वाजता सुरू होणार असून ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर अर्ध्या तासासाठी केदारनाथाला भोग दिला जाईल. त्यासाठी मंदिर बंद ठेवले जाईल.

गाभाऱ्याच्या स्वच्छतेनंतर संध्याकाळी चार वाजता पुन्हा दर्शन सुरू होईल. ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहील. संध्याकाळच्या आरतीसोबत बाबा केदारनाथाच्या श्रुंगारदर्शनला सुरुवात होईल. ते रात्री १२वाजेपर्यंत सुरू राहील. केदारनाथ यात्रा यशस्वी व्हावी, यासाठी समितीचे ८० कर्मचारी रोटेशन तत्त्वावर आठ-आठ तासांची ड्युटी करून भाविकांना निर्वेध दर्शन मिळावे, यासाठी झटत आहेत.

हे ही वाचा:

तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यापूर्वी केजारीवाल हनुमानाच्या चरणी

पाकव्याप्त काश्मीर म्हणजे विदेशी भूमी; चक्क पाकिस्तान सरकारची न्यायालयात कबुली

‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण

प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले

जूनमध्ये भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने एका दिवसात अधिकाधिक भक्तांना दर्शन मिळावे, यासाठी तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडेचार वाजता धर्म दर्शनाला सुरुवात होईल आणि एका तासात १८०० भाविकांना दर्शन दिले जाईल. अधिक गर्दी झाल्यास ही संख्या वाढवली जाईल. शृंगार दर्शनाची वेळ रात्री १२ वाजेपर्यंतच असेल.
– योगेंद्र सिंह, सीईओ, श्रीद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती

Exit mobile version