उत्तर प्रदेशातील सुमारे १८ जणांनी १५ वर्षांपूर्वी हिंदु धर्म त्यागून मुस्लिम धर्माचा स्वीकार केला होता. परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा सन्मानाने हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशातील कांधला गावातील महाभारतकालीन मंदिरात जाऊन त्यांनी विधिवत हिंदू धर्मात प्रवेश केला.
एकाच परिवारातील एकूण १८ जणांनी सोमवारी हिंदू धर्मात प्रवेश केला. कांधला गावातील या कुटुंबाने १५ वर्षांपूर्वी हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्मात प्रवेश केला होता. गेली १५ वर्षं ते मुस्लीम धर्माचा अनुनय करत होते. आता त्यांनी मुस्लीम धर्म सोडून पुन्हा आपल्या मूळ हिंदु धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कांधल्यातील प्रसिद्ध सूरज कुंड मंदिरात या कुटुंबीयांना हिंदु धर्मात प्रवेश देण्यात आला.
हे ही वाचा:
चालुक्य कालीन मंदिरात झाली चोरी!
अनधिकृत बांधकामांचा शेवटचा दिवस ३१ ऑगस्ट
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
मूळचे उत्तर प्रदेशमधील रायजादगानमधले रहिवासी असणाऱ्या शहजाद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदु धर्मात परत येण्याचा निर्णय घेतला. शहजाद यांचे एकत्र कुटुंब असले तरी, ती एकूण तीन कुटुंबे आहेत. या तीनही कुटुंबांतील १८ सदस्यांनी हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यासाठी सूरज कुंड मंदिराच्या आवारात यज्ञ करण्यात आला होता. धार्मिक विधींनुसार या १८ जणांचं शुद्धीकरण करून त्यांना हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर त्यांना जानवं परिधान करायला देण्यात आले आणि शहजाद हे नाव बदलण्यात आलं. शहजादचे मूळ हिंदु नाव विकास होते. ते बदलून शहजाद करण्यात आले होते. आता पुन्हा त्याचे नाव विकास झाल्याची माहिती आहे.
विकासचे दोन भाऊ आणि त्याच्या आईनंही हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. विकासच्या वडिलांनी मात्र मुस्लीम धर्मातच राहणं पसंत केलं आहे. मात्र लवकरच त्यांचंही मनपरिवर्तन करून त्यांना हिंदू धर्मात आणू, असा विश्वास विकासच्या आईने व्यक्त केला आहे. तर अनेक नागरिक चुकीचा निर्णय घेऊन हिंदु धर्म सोडतात, मात्र त्यांना उपरती होऊन पुन्हा ते हिंदु धर्मात परत आल्यामुळे त्यांचं स्वागत करत असल्याचे हा विधी करणाऱ्या पुरोहितांनी म्हटले आहे.