हिंदू धर्मातील महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्री, हा सण सृष्टी, संरक्षण आणि विनाशाची वैश्विक शक्ती असलेल्या भगवान शिव यांना समर्पित आहे. यंदाची महाशिवरात्र ही विशेष आहे कारण जगातील सर्वात मोठा अशा आध्यात्मिक मेळा म्हणून ओळख असलेल्या महाकुंभ मेळ्याची सांगता याचं दिवशी होणार आहे.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ मेळा आणि पवित्र असा महाशिवरात्री सण या दोन घटना एकत्र आल्यामुळे शक्तिशाली आध्यात्मिक उर्जा निर्माण होऊन लाखो भक्तांना शुद्धीकरण, मुक्ती आणि दैवी आशीर्वादांच्या शोधात पवित्र अशा त्रिवेणी संगमाकडे आकर्षित करत आहे. १३ जानेवारी रोजी सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्याचा समारोप २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिवशी होणार आहे.
भगवान शिव भक्तीचे प्रतीक असलेल्या महाशिवरात्रीला कुंभमेळ्यामध्ये विशेष स्थान आहे. हिंदू मान्यतेनुसार, याचं रात्री शिवाने तांडव केले, याचं वैश्विक नृत्यामुळे अस्तित्वाचे चक्र टिकून राहिले. हा दिवस देवी पार्वतीसोबतच्या दैवी मिलनाचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. कुंभमेळा हा स्वतःच शुद्धीकरणाचा उत्सव आहे, जिथे भक्त प्रयागराजमधील त्रिवेणी संगम जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम आहे अशा ठिकाणी डुबकी घेत पवित्र स्नान करतात. असे मानले जाते की पवित्र स्नान केल्याने पापं धुतली जातात आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. महाशिवरात्रीला, या पवित्र स्नानाचे महत्त्व आणखी वाढते. भक्तांचा असा विश्वास आहे की, या दिवशी संगमामध्ये स्नान केल्याने, भगवान शिवाच्या आशीर्वादाने आध्यात्मिक लाभ वाढतात.
२६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशीच या भव्य आध्यात्मिक मेळ्याचा समारोप होणार आहे. १३ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या मेळ्यात संत आणि अध्यात्मिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली तीन शाही स्नान धरून स्नानाचे सहा प्रमुख दिवस होते. महाशिवरात्रीला होणारे अंतिम स्नान हे शाही स्नान नसले तरी महिनाभर चालणाऱ्या अध्यात्मिक यात्रेचा शेवटचा विधी म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. यादिवशी भक्त संपूर्ण मेळ्यात तपस्या, ध्यान आणि प्रार्थनांमध्ये गुंतलेले असतात, भगवान शिवाला नमस्कार करतात. या दिवशी वातावरण अत्यंत भक्तीमय असते. सर्व घाट ‘ओम नमः शिवाय’ च्या मंत्राने गुंजतात, मंदिरातील घंटा एकसंधपणे वाजत असतात, उदबत्त्यांच्या सुगंधाने वातावरण प्रसन्न झालेले असते आणि दिव्यांचा प्रकाश असतो. अनेकांसाठी, ही डुबकी म्हणजे आत्मसमर्पणाचा क्षण असून आंतरिक परिवर्तन आणि मुक्तीसाठी शिवाची कृपा मिळविण्याची संधी आहे.
महाशिवरात्री आणि कुंभमेळा यांच्यातील संबंध हिंदू पौराणिक कथांमधील मूळांमुळे समृद्ध आहे. कुंभमेळा त्या क्षणाचे स्मरण करतो जेव्हा समुद्र मंथनादरम्यान चार पवित्र स्थळांवर अमृताचे थेंब सांडले. ही चार पवित्र स्थळं म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. भगवान शिव, सर्वोच्च तपस्वी आणि संरक्षक म्हणून, या कथेशी घट्टपणे जोडलेले आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या, हा दिवस हिंदू परंपरांचा जिवंतपणा दाखवून देतो. साधू, विशेषतः शिवाला समर्पित असलेले नागा साधू, हे एक प्रमुख भूमिका निभावतात. त्यांचे राखेने माखलेले शरीर आणि त्रिशूळ एक गूढ निर्माण करतात. भक्त रात्री- अपरात्री जागरण, उपवास आणि ध्यानात गुंततात, शिवाच्या तपस्वी आदर्शांना प्रतिबिंबित करतात. यामुळेच संगमावर जमलेल्या लाखो लोकांची सामूहिक ऊर्जा ऐक्य आणि भक्तीची भावना वाढवते.
कुंभमेळ्यातील महाशिवरात्री ही एक विधीपेक्षा अधिक आहे. ही एक परिवर्तनकारी आध्यात्मिक विधी आहे, असे मानले जाते. कुंभाचे शुद्धीकरण करणारे स्नान आणि शिवाची दैवी उपस्थिती यांचे एकत्र असणे ही भक्तांसाठी एक दुर्मिळ संधी निर्माण करणारी आहे.
प्रयागराजमधील कुंभ मेळा हा नवा नव्हता पण विशिष्ट खगोलीय परिस्थितीमुळे एक दुर्मिळ योग निर्माण होऊन हा मेळा १४४ वर्षांनी येणारा ‘महाकुंभ’ मेळा ठरला. शिवाय महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या महाकुंभ मेळ्याचा होणारा समारोप याला आणखी महत्त्व प्राप्त करून देत आहे. असे असले तरी या महाकुंभाचे वैशिष्ट्य असे होते की, उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने या महाकुंभ मेळ्याच्या आयोजनासाठी आणि त्याच्या यशस्वी संपन्नतेसाठी आपली संपूर्ण ताकद लावून दिली होती. महाकुंभ महाशिवरात्रीच्या दिवशी समाप्त होईल, पण त्याआधीच या आयोजनाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. भव्य नागरी सुविधांची निर्मिती, त्यांचे प्रभावी व्यवस्थापन आणि जगातील सर्वांत मोठ्या जनसमुदायाच्या मेळाव्यासह, असे अनेक विक्रम या महाकुंभाने प्रस्थापित केले आहेत, ज्यांची गणनाही करणे कठीण आहे.
प्रशासनातील जवळपास सर्व विभागांचे सर्वाधिक सक्षम आणि कार्यक्षम अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयागराज येथे नियुक्त करण्यात आले होते. वाहतूक, सार्वजनिक आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा, परिवहन अशा सर्वच विभागांचे अधिकारी कर्मचारी महाकुंभ मेळ्यातील आयोजनात गुंतले होते. महाकुंभ मेळ्यापूर्वी साधारण ४० ते ४५ कोटी भाविक सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती मात्र, हा अंदाज महाकुंभ समाप्त होण्यापूर्वीच भाविकांच्या संख्येने हा आकडा पार केला. ६५ कोटींपेक्षा अधिक भाविकांनी आतापर्यंत महाकुंभ मेळ्यात हजेरी लावली आहे.
हे ही वाचा :
काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा!
बांगलादेश म्हणतो, अमेरिकेचे ३ कोटी डॉलर आम्हाला मिळालेलेच नाहीत!
‘आप’च्या दिल्ली दारू धोरणामुळे २,००२ कोटी रुपयांचा महसूल तोटा!
महाकुंभ: महाशिवरात्रीला शेवटच्या अमृतस्नानाला १ कोटीहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता!
राज्य सरकारने महाकुंभ मेळ्याच्या आयोजनासाठी ५००० कोटी रुपये खर्च केले, यावर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली. मात्र, दुसरीकडे महाकुंभच्या आयोजनामुळे तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा व्यवसाय नोंदवला गेला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे योगी सरकारने नियोजनबद्ध पद्धतीने कुंभचा केलेला प्रचार आणि योग्य पुरवलेल्या नागरी सुविधा. इतक्या प्रचंड प्रमाणात लोकसंख्या प्रयागराजमध्ये एकत्र येऊनही कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. कुठेही मोठ्या प्रमाणावर भगदड किंवा प्रशासनाचे अपयश दिसून आले नाही. हे योग्य नियोजन आणि उत्तर प्रदेश शासन तसेच केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांमधील उत्कृष्ट समन्वयाचे प्रतीक आहे. याशिवाय, यशस्वी आयोजन, भव्य नागरी सुविधांची उभारणी, त्यांचे प्रभावी संचालन आणि प्रत्येक भाविकाला उत्तम सुविधा पुरवणे याचे श्रेय केवळ सरकारी यंत्रणांना नाही, तर विविध आखाडे, सामाजिक संघटना, तसेच धार्मिक संप्रदायांशी संबंधित असलेल्या असंख्य स्वयंसेवकांना जाते.
जगभरात भारत आणि भारतीय समाजाच्या जातिव्यवस्थेवर टीका करणाऱ्यांसाठी हा त्यांचा आवडता विषय असतो. मात्र, या महाकुंभाच्या भव्य आयोजनाने अशा भारतविरोधी विचारसरणीला खोडून काढले आहे. भारतीय समाज हा एकात्म, समरस आणि ऐक्याचा संदेश देणारा आहे. येथे जातीय भेदभावाला स्थान नाही, तर भारतीयत्वच त्यांना जोडणारा प्रमुख धागा आहे. हीच या महाकुंभाची सर्वात मोठी उपलब्धी मानली जाऊ शकते.