कोणी जावो अथवा न जावो, राम मंदिर सोहळ्याला मी जाणार!

कोणी जावो अथवा न जावो, राम मंदिर सोहळ्याला मी जाणार!

अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकासाठी आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्येत सुरू आहे. दुसरीकडे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी म्हणून अनेक दिग्गज मंडळींना निमंत्रण पत्रिका देण्याचे काम सुरू आहे. या कार्यक्रमात ऋषी- मुनींसोबतच देशभरातील अनेक मातब्बर व्यक्ती सहभागी होणार आहेत. अनेक क्रिकेटपटूंनाही निमंत्रण देण्यात आले. महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंना २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळाले आहे.

दुसरीकडे यावरुन राजकारणही पेटलं आहे. अनेक राजकीय पक्षांनी भाजपाचा राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगत येथे जाण्यास नकार दिला आहे. अशातच क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी मात्र त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी ‘एएनआय’शी बोलताना स्पष्ट केले आहे की, “ज्याला जायचे नसेल त्याने जाऊ नये, मी जाईन.”

एएनआयशी बोलताना हरभजन सिंग म्हणाले की, “कोण काय म्हणत आहे हा खूप वेगळा मुद्दा आहे. हे मंदिर यावेळी बांधले जात आहे हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जाऊन आशीर्वाद घ्यायला हवा. कोणी जावो न जावो माझी देवावर श्रद्धा आहे आणि जाईन. इतर कोणता पक्ष जाईल न जाईल पण वैयक्तिक मत हेच आहे की मी जाणार आहे. काँग्रेसला जायचे असेल तर जावे नसेल जायचे तरी जाऊ नये. इतर पक्षांनाही तेच लागू आहे. माझ्या राम मंदिरात जाण्याबाबत कोणाला काही अडचण असेल तर ते त्यांना हवे ते करू शकतात. माझा देवावर विश्वास आहे, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते देवाची कृपा आहे, मी नक्कीच आशीर्वाद घेण्यासाठी जाईन,” अशी भूमिका हरभजन सिंग यांनी मांडली आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी पदाचा दिला राजीनामा

किशोरी पेडणेकर, रोहित पवारांना ईडीकडून समन्स

देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश म्हणाला, ‘माझा रामलल्ला विराजमान झाला’!

राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. इतर काही राजकीय पक्षांनी आणि भाजपाच्या विरोधकांनी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नव्याने उभी राहत असलेल्या इंडिया आघाडीला हरभजन सिंग यांनी हा घराचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version