रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला अद्याप विराम मिळालेला नाही. दोन्ही देशांकडून हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूचं आहेत. अशातच माहितीनुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की हे मिसाईल हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याचे सांगितले जात आहे. झेलेन्स्की यांच्या ताफ्याच्या अगदी जवळ सुमारे ५०० मीटर अंतरावर रशियाने सोडलेले एक मिसाईल पडल्याचे सांगण्यात येत आहे. रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच झेलेन्स्कीच्या इतक्या जवळ क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे.
गेल्या महिन्यात रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाली. अनेक प्रयत्न करूनही दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित झालेली नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि ग्रीसचे पंतप्रधान ओडेसामध्ये भेटणार होते. यावेळी जेव्हा राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा ताफा ग्रीक दूतावासात पोहोचला तेव्हा जवळपास ५०० मीटर अंतरावर क्षेपणास्त्र हल्ला झाला. त्यामुळे ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले असल्याचे म्हटले जात आहे. युद्धादरम्यान झेलेन्स्की यांनी वारंवार युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी प्रवास केला आहे. अनेकदा मोठ्या जोखमीवर फ्रंट-लाइन स्थानांना भेट दिली आहे. परंतु, हा हल्ला अगदीच त्यांच्या जवळ झाला.
हे ही वाचा :
एडनच्या आखातात येमेनच्या हौती बंडखोरांकडून क्षेपणास्त्रहल्ला; दोघांचा मृत्यू
‘राजकीयदृष्ट्या पक्षपाती निर्णय कधीच दिला नाही’
पोलिसभरती पेपरफुटी प्रकरणी सात जणांना अटक!
रशियाने युक्रेनच्या काही शहरांवर ताबा मिळवलाय. युक्रेन अजूनही रशियासमोर टिकून आहे. अमेरिका आणि नाटो देश अजूनही युक्रेनच्या बाजूने आहेत. रशियन सैन्याने युक्रेनची काही शहर ताब्यात घेतली असून रणनितीक दृष्टीने महत्त्वपूर्ण भाग रशियाने आपल्या ताब्यात ठेवला आहे.