अरुणाचल प्रदेशातील मिराम तारोन हा तरुण १८ जानेवारी रोजी चुकून चीनच्या सीमेत घुसला होता. आता तो भारतात सुखरूप परतला आहे. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास, चीनच्या लष्कराने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या एलएसीवरील किबिथू-बीपीएम हट येथे मीरामला भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले. स्वतः कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
मिरामला भारतीय लष्कराकडे सुपूर्द करताना दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करून पीपीई किट घातल्या होत्या. मीरमनेही पीपीई किट घातले होते. नंतर भारतीय सीमेवर परतल्यावर मीरमने चेहऱ्यावरील मास्क काढून भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत फोटो काढला. भारतात परतल्यावर मिरामची आवश्यक चौकशी आणि कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून मीरमला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल.
चीनच्या हद्दीत तो कसा गेला?
१८ जानेवारी रोजी मीरम त्याच्या साथीदारासह शिकार करण्याच्या आणि वनौषधी शोधण्याच्या उद्देशाने जंगलात गेला होता. मात्र भारत आणि चीनच्या सीमेवर कुंपण नसल्यामुळे तेथून ते दोघे चीनच्या हद्दीत घुसले. त्यांनी अरुणाचल प्रदेशातील अप्पर-सियांग या त्याच्या मूळ जिल्ह्यातून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आणि चीनच्या सीमेत प्रवेश केला. यादरम्यान चिनी सैनिकांनी मीरमला ताब्यात घेतले होते. त्याचा साथीदार कसातरी निसटून परत आला होता आणि त्यानेच मीरमच्या अपहरणाची माहिती दिली.
यानंतर अरुणाचल प्रदेशचे खासदार, तापीर गाओ यांनी ट्विट करून माहिती दिली होती की, चीनच्या पीएलए आर्मीने अप्पर-सियांग जिल्ह्यातील LAC शेजारील १७ वर्षीय स्थानिक तरुण मिराम तारोनचे ‘अपहरण’ केले आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका…भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द
पाकिस्तानमध्ये आणखीन एका मंदिराची तोडफोड
एअर इंडिया आली, टाटांच्या पंखांखाली
त्याच्या सुटकेसाठी तापीर यांनी भारत सरकारच्या सर्व ‘एजन्सी’कडे आवाहन केले होते. खासदारांच्या विनंतीनंतर भारतीय लष्कराने त्याला सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अरुणाचलमधील स्थानिक लष्कराने या हॉटलाइनवर चीनच्या पीएलए आर्मीशी संपर्क प्रस्थापित केला आणि २३ जानेवारी रोजी चिनी सैन्याने मीरमला ताब्यात घेतल्याची कबुली देऊन त्याला परत करण्याचे आश्वासन दिले होते.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशातील अप्पर-सुबनसरी जिल्ह्यातून पाच तरुणांना ताब्यात घेतले होते. हे तरुण जंगलात शिकारीसाठी गेले होते आणि त्यावेळी चीनच्या हद्दीत घुसले होते. भारतीय लष्कराच्या प्रयत्नांमुळे या तरुणांची सुटका करण्यात आली होती.