अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे जगभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, ट्रम्प यांनी भारतासह ७५ देशांसाठी ९० दिवसांच्या आयात शुल्कावरील स्थगिती जाहीर केली. यामुळे अनेक देशांना दिलासा मिळाला असला तरी त्यांनी चीनला मात्र जोरदार दणका दिला आहे. चिनी आयातीवरील कर १२५ टक्क्यांपर्यंत वाढवला. एकीकडे टॅरिफ वॉरमुळे अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झालेला असताना दुसरीकडे ट्रम्प मात्र चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना दिसत आहेत.
ट्रम्प प्रशासनाच्या धडाकेबाज निर्णयांमुळे जगभरात खळबळ उडालेली असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांना जगातील सर्वात हुशार लोकांपैकी एक व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. वॉशिंग्टन आणि बीजिंग दोघेही एकमेकांवर वाढत्या कराच्या धमक्या देत असले तरीही ट्रम्प यांनी जिनपिंग यांच्या केलेल्या कौतुकानंतर जगभरातून भुवया उंचावल्या जात आहेत. शी जिनपिंग हे अत्यंत हुशार असून आम्ही खूप चांगला करार करू, असे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले. चीनविरुद्ध आतापर्यंतच्या सर्वात कडक व्यापार उपाययोजनांवर त्यांनी स्वाक्षरी केली आणि दुसरीकडे त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. जिनपिंग हे असे व्यक्ती आहेत ज्यांना माहीत आहे की, त्यांना नेमके काय करायचे आहे. ते आपल्या देशावर प्रेम करतात. त्यांच्याशी थेट बोलायला तयार असून कधीतरी फोन येईल आणि स्पर्धा सुरू होईल, असं ट्रम्प पुढे म्हणाले.
मोठ्या प्रमाणात नवीन कर लादल्यानंतर अवघ्या एका दिवसात, ट्रम्प यांनी ७५ हून अधिक देशांसाठी ९० दिवसांच्या शुल्कावरील विराम जाहीर केला, ज्यामुळे अनेक अमेरिकन मित्र राष्ट्रांवरील दबाव कमी झाला आणि त्याच वेळी चीनला आणखी कठोर फटका बसला कारण चिनी आयातीवरील कर १२५ टक्क्यांपर्यंत वाढवला.
हे ही वाचा..
जेएनयूमध्ये पुन्हा शांभवी थिटेने डाव्यांना आवाज दिला; महाराणा प्रताप यांचा अपमान
संविधानानुसार वक्फ विधेयक मंजूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५० वा वाराणसीचा दौरा
तहव्वुर राणाला काय शिक्षा व्हावी ?
बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवरील आयात शुल्कात तात्काळ १२५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली. चीनने १० एप्रिलपासून अमेरिकन वस्तूंवरील ३४ टक्क्यांवरून ८४ टक्क्यांपर्यंत कर वाढवला आहे, ज्याला प्रतिसाद म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याच वेळी, ट्रम्प म्हणाले की ते सध्या अमेरिकेशी व्यापार चर्चेत असलेल्या ७५ देशांसाठी कर कमी करतील, ९० दिवसांचा ब्रेक आणि कमी परस्पर कर संरचना देतील. भारत या देशांमध्ये आहे.