अफगाणिस्तानमध्ये तालिबानींची पुन्हा राजवट आल्यानंतर आता परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर चालली आहे. जवळपास सगळा अफगाणिस्तान तालिबानींच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे नागरिकांची जीव वाचविण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे.
तालिबानींची अन्यायकारक राजवट येणार हे लक्षात घेता नागरिकांनी विमानतळावर प्रचंड गर्दी केली आहे. एखाद्या एसटीच्या डेपोत बसमध्ये चढण्यासाठी जशी चेंगराचेंगरी होते, तसाच प्रकार काबुल विमानतळावर पाहायला मिळतो आहे.
यासंदर्भात एक व्हीडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून त्यात एका विमानात चढण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसते आहे. विमानात जाण्यासाठी शिड्यांवर चढून आत शिरण्याचा, त्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करणारे लोक दिसत आहेत. या जमावाला पांगविण्यासाठी तेथील अमेरिकन सैनिक हवेत गोळीबारही करत आहेत. पण आता त्या गोळ्यांच्या आवाजाकडेही लक्ष देण्यास कुणाकडे वेळ नाही.
तालिबानने हळूहळू एकेक शहर ताब्यात घेत रविवारी काबुलवर आक्रमण केले. हे शहर ताब्यात आल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्षही राजीनामा देऊन परागंदा झाले. त्यामुळे आगामी काळात तालिबानींचे अत्याचार अफगाणिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना सहन करावे लागणार आहेत.
हे ही वाचा:
जलतरण तलाव कधी होणार ‘कोरोनामुक्त’?
अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्र सैन्य पाठवणार?
अफगाणिस्तानच्या पतनाला कोण जबाबदार?
अफगाणिस्तानातील पुजारी म्हणतो मी देश सोडणार नाही… जाणून घ्या का ते..
तालिबानींनी तेथील महिलांना आपल्या सैनिकांशी विवाह करण्याची सक्तीही केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अफगाणिस्तानात मानवाधिकारांची पायमल्ली होणार हेच दिसते आहे. अन्य देशांच्या दुतावासातील अधिकारी, परदेशी नागरीक हे हळूहळू अफगाणिस्तानातून बाहेर पडले आहेत. भारतानेही आपल्या नागरिकांना तिथून हलविले आहे.