सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु असून दोन्ही देशांकडून मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने जगातील सर्वात मोठे विमान मरियाला (AN-225 Mriya) नेस्तनाबूत केले आहे. रविवारी रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये हे विमान उद्ध्वस्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.
युक्रेनने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ट्विट करत या विमानाच्या नुकसानाबद्दल माहिती दिली आहे. ‘जगातील सर्वांत मोठं विमान मरिया (द ड्रीम) कीवजवळील एका हवाई क्षेत्रामध्ये रशियन सैनिकांद्वारे नष्ट करण्यात आले आहे. मात्र, आम्ही या विमानाची पुनर्बांधणी करु. आम्ही एक मजबूत, स्वतंत्र, लोकशाही युक्रेनचे आमचे स्वप्न जरुर पूर्ण करु,’ असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटसोबत त्यांनी विमानाचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, त्यांनी सर्वांत मोठं विमान जाळून उद्ध्वस्त केलं मात्र, आमची ‘मरिया’ कधीच नष्ट होणार नाही.
हे ही वाचा:
श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयासह भारताने रचले हे नवे विक्रम
युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक
युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण
भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक
नुकसान झालेल्या मरियाला पुन्हा तयार करण्यासाठी ३ बिलीयन डॉलरहून अधिक खर्च येऊ शकतो आणि यासाठी पाच वर्षे लागू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मरिया हे ८४ मीटर लांब (२७६ फूट) विमान जगासाठी अद्वितीय होते. हे विमान ८५० किमी प्रति तासाच्या गतीने २५० टन कार्गोपर्यंत घेऊन जाऊ शकत होते. या विमानाला ‘मरिया’ असे नाव देण्यात आले होते. मरिया म्हणजे ‘स्वप्न’ असा अर्थ आहे.