भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकपच्या ज्या लढती आतापर्यंत झाल्या त्यापैकी धक्कादायक अशा सामन्याची नोंद रविवारी झाली. अफगाणिस्तानने चक्क गतविजेत्या इंग्लंडवर दणदणीत मात केली आणि तमाम क्रिकेटविश्वाला हादरवले. अफगाणिस्तानने २८४ धावा केल्या, पण त्याला उत्तर देताना विश्वविजेता इंग्लंड संघ केवळ २१५ धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. अफगाणिस्तानने ही लढत ६९ धावांनी जिंकली.
दिल्लीत रंगलेल्या या लढतीत अफगाणिस्तानच्या रहमनुल्ला गुरबाझने ५७ चेंडूंत ८० धावांची दणदणीत खेळी केली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या तळाचा फलंदाज इक्रम अलीखिलने अर्धशतकी खेळी केल्यामुळे अफगाणिस्तानला इंग्लंडविरुद्ध चांगली धावसंख्या उभारता आली.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. तसेच न्यूझीलंडविरुद्ध अगदी हीच धावसंख्या इंग्लंडने मागे टाकली होती. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळविणे फारसे कठीण जाणार नाही, असा इंग्लंडचा होरा होता. प्रकाशझोतात आपण फलंदाजीला उतरलो की चेंडू थेट बॅटवर येईल असा अंदाज होता. पण अफगाणिस्तानच्या फर्जलहक फारुकी व मुजीब उर रेहमान यांच्या गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांची दाणादाण उडविली.
हे ही वाचा:
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर ठार!
भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र
गोलंदाज एल. शिवरामकृष्णनने केले राजदीपला त्रिफळाचीत!
पॅलेस्टाइनवरून तस्लिमा नसरिन यांनी बांगलादेशवासियांना सुनावले
जॉनी बेअरस्टो, जो रूट, डेव्हिड मालन हे तीन फलंदाज ६८ धावांतच माघारी परतले. त्यामुळे इंग्लंडवर संकटाचे ढग जमा होऊ लागले. मग हॅरी ब्रूक आणि जोस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण जोस बटलर नवीन उल हकच्या गोलंदाजीवर बाद झाला. ब्रूकने मात्र अर्धशतकी खेळी (६६) केली. मात्र हा अपवाद वगळता इंग्लंडच्या बाकी फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे इंग्लंडचा डाव २१५ धावसंख्येवर आटोपला. अफगाणिस्तानच्या मुजीबने सर्वाधिक तीन बळी घेतले मग नबी आणि रशिद खान यांनी अनुक्रमे २ आणि ३ बळी घेतले.
या विजयासह अफगाणिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. त्याआधी भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान व इंग्लंड असे संघ आहेत. सर्वाधिक विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात मात्र एकही गुण जमा नाही.