अफगाणिस्तानवर आता तालिबानने संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. तालिबानच्या कब्जामुळे देशातील सर्वच खेळाडूंचे भविष्य चिंतेत आहे. याच पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधाराने खेळाडूंना आपली सार्वजनिक ओळख पुसून टाका, सोशल मिडियावरील खाती बंद करा आणि सुरक्षिततेसाठी तुमच्या स्पोर्ट्स कीट जाळून टाका कारण आता परत तालिबानचे वर्चस्व आहे, असे सांगितले आहे.
कोपहेगेन येथे असलेल्या खालिदा पोपल हिने ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला व्हिडीओ मुलाखत देताना सांगितले की, भूतकाळात अतिरेक्यांनी महिलांची हत्या केली होती, त्यांच्यावर बलात्कार केला होता आणि त्यांच्यावर दगडफेकही केली होती. त्यावेळेस महिला फुटबॉलपटूना त्यांच्या भविष्याची चिंता होती.
हे ही वाचा:
तालिबानपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करत आहेत महिला?
पुणे पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही थोडे ब्रह्मज्ञान द्यावे
सुरक्षेसाठी खेळाडूंनी नावे बदलावीत, सार्वजनिक ओळख पुसून टाकावी आणि समाज माध्यमांवरील फोटोही काढून टाकावेत आणि आपल्या टीमचे कपडेही जाळून टाका, असे खालिदा हिने सांगितले आहे. टीमचे कपडे नष्ट करताना खूप वाईट वाटेल कारण देशाच्या संघात जागा मिळवून ओळख निर्माण करायला खूप कष्ट घेतले आहेत. देशासाठी खेळताना गर्व वाटत होता असेही तिने सांगितले.
१९९६- २००१ मध्ये तालिबानी शासनात महिलांना शिक्षण घेण्यास आणि नोकरी करण्यास बंदी होती. महिलांना बुरखा घालून आणि पुरुषांच्या साथीनेच बाहेर फिरण्यास परवानगी होती. नियम मोडणाऱ्या महिलेला कठोर शिक्षा केली जात असे. सध्या महिला खेळाडूंच्या मनात खूप भिती आहे. त्यांची मदत करायला कोणीही नसल्याचे खालिदाने सांगितले आहे.
अफगाण महिला फुटबॉल लीगच्या सह- संस्थापकाने सांगितले की, तिने तिचा आवाज हा नेहमी तरुणींना मजबूत, धैर्यवान आणि प्रभावशाली राहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी वापरला आहे, पण आता माझ्याकडे वेगळाच संदेश आहे असेही तिने सांगितले.